रायपूर : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकांना आता केवळ काहीच दिवस शिल्लक आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आज येथील दंतेवाडा दौऱ्यावर जाणार होते. परंतु मोदींच्या दंतेवाड्यात दाखल होण्यापूर्वी दंतेवाड्यातील बचेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत स्फोट झाला आहे. तसेच नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाद्वारे सीआयएसएफच्या बसला उडवले. यामध्ये एक जवान शहीद झाला आहे. तसेच अन्य तीन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी १२ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मोदींनी येथे एका मोठ्या रॅलीचे आयोजन केले होते.


घटना काय?

दंतेवाडा हा नक्षली परिसर आहे. येथील बचेली येथे नक्षलवाद्यांनी गुरुवारी सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या एका बसला लक्ष्य केले. भूसुरूंगांचा वापर करुन नक्षलवाद्यांनी स्फोट घडवून आणला. या स्फोटात एका जवान शहीद झाला असून तीन नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. या स्फोटामध्ये अनेकजण जखमी झाले आहेत, त्यापैकी काहीजण गंभीर आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींवर सध्या जवळच्याच रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.


30 ऑक्टोबर रोजी दंतेवाडामधील नीलवाया गावात पोलिसांवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये पोलिसांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. अच्युतानंद माहू असे त्या पत्रकाराचे नाव असून ते दूरदर्शनचे कॅमेरामन होते.