नवी दिल्ली: भाजप अध्यक्ष अमित शाह यांना एमआयएम मुक्त नाही तर मु्स्लिम मुक्त देश हवा आहे, असं वक्तव्य एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ओवेसी बोलत होते.


तेलंगणातील बहादुरपूर येथील प्रचार सभेत बोलत असताना ओवेसी म्हणाले की, "अमित शाह म्हणतात मजलिस मुक्त देश करायचे आहे, पण अमित शाह मजलिस मुक्त नव्हे तर मुसलमानांना पळवून लावू इच्छितात. परंतु मुस्लिमांना या देशात राहण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला आहे."

भाजप तेलंगणात काहीही करून विजय मिळवायचा प्रयत्न करत आहे. मात्र भाजपाला तेलंगणात यश मिळणार नाही, असं ओवेसी म्हणाले.

ओवेसींनी भाजपसह कॉंग्रेस, तेलगू देसम या पक्षांवर पण हल्लाबोल केला. ओवेसी म्हणाले की, कॉंग्रेस, तेलगू देसम, आणि भाजपा यापैकी कोणाची सत्ता आल्यास तेलंगणाचे सरकार दिल्ली, आंध्र प्रदेश ,नागपूर येथून चालेल. असं म्हणत "मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है." असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आंध्र प्रदेश राज्यापासून वेगळ झाल्यानंतर तेलंगणात पहिल्यांदाच निवडणुका होत आहे. सध्या राज्यात टीआरएसची सत्ता आहे. तर या निवडणुकीत कॉंग्रेसने चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष टीडीपीसह युती केली आहे. तसेच भाजपही मोठ्या ताकदीने मैदानात उतरला आहे.

ओवेसींचा पक्ष एमआयएमचेही काही ठिकाणी वर्चस्व आहे. सध्या तेलंगणा विधानसभेत एमआयएमचे सात आमदार आहेत. तेलंगणाच्या सर्व 119 जागांसाठी 7 डिसेंबरला मतदान होणार आहे तर 11 डिसेंबरला मतमोजणी होईल.