पणजी : बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून वारंवार होणाऱ्या तपासाला कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपास सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी कायदेशीररीत्या बीफ आणून विक्री करण्यास संघटनेला सांगितल्यामुळे बुधवारपासून बीफ विक्री सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मुन्ना बेपारी यांनी सांगितले.
बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्थांकडून वारंवार होणाऱ्या तपासाला कंटाळून येथील कुरेशी मांस विक्रेत्या संघटनेने पुकारलेल्या संपास सोमवारी पूर्णविराम मिळाला आहे. तीन दिवस राज्यातील बीफ विक्री न झाल्याने सुमारे पावणे दोन कोटींची उलाढाल ठप्प झाली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कायदेशीररीत्या बीफ आणून विक्री करण्यास संघटनेला सांगितल्यामुळे उद्या, बुधवारपासून बीफ विक्री सुरू होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष मुन्ना बेपारी यांनी सांगितले.
बेपारी म्हणाले की, आम्ही बेकायदेशीर बीफ विक्रीच्या विरोधात आहोत. गोव्यात येणारे बीफ पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या अधिकाऱ्यांनीच तपासावे. बिगरसरकारी पशुसंवर्धन संस्था बीफ तपासू नये, त्यांना कोठे बीफ बेकायदेशीर विक्री होत असल्याचे आढळत असेल, तर त्यांनी ते सरकारच्या पशुसंवर्धन खात्याच्या निदर्शनास आणून द्यावे, अशी आम्ही आमची कैफियत मुख्यमंत्र्यांकडे मांडली होती. त्यांनी कायदेशीर बीफ विक्रीला सरकारची अजिबात हरकत नसल्याचे सांगितले आहे. आम्ही कर्नाटकातून कायदेशीररित्या बीफ आणण्यास वाहने पाठविली असून, मंगळवारपासून त्याची विक्री सुरू होईल.
दरम्यान, तीन दिवस बीफ विक्री बंद राहिल्याने 1 कोटी 87 लाख रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. पुन्हा बंद ठेवलेले शटर उद्या उघडले जाईल. त्यामुळे बीफ विक्रीवर अवलंबून असलेले इतर व्यवसायही पूर्ववत सुरू होतील, असे बेपारी म्हणाले. कर्नाटकातून बीफ आणताना आता वाहनमालकाला सर्व कागदपत्रे ठेवावी लागणार आहेत. कारण कायदेशीर कागदपत्रे असल्यानंतर पोलीस कारवाई होणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्वत: संघटनेला बजावले आहे.
उसगावचा कत्तलखाना सुरू करा !
सरकारने उसगाव येथील कत्तलखान्याचा परवाना लवकरात लवकर नूतनीकरण करावा, म्हणजे येथे कायदेशीर बीफ मिळू शकते, असे संघटनेचे म्हणणे आहे. कत्तलखान्याचा परवाना नूतनीकरण हे तांत्रिक अडचणीमुळे लटकले असल्याचे सांगितले जाते, तर सरकारने त्यात लक्ष घालावे आणि ती अडचण दूर करावी, अशी मागणी संघटनेनी केली आहे. काही दिवसांपूर्वी बीफ विक्री बंद झाली होती, तेव्हा उच्च न्यायालयाने सरकारने उसगावचा कत्तलखाना लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश दिले होते. तरीही तो कत्तलखाना सुरू होत नसल्याने येथील बीफ विक्रेत्यांना कर्नाटकातून बीफ आणावे लागत आहे.