नवी दिल्ली : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यात संतापाचा उद्रेक झाला असतानाच आता हे प्रकरण दिल्लीत सुद्धा पोहोचलं आहे. बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आगोयाची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. संतोष देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.
आयोगाला आम्ही तक्रार दिली
बजरंग सोनावणे यांनी सांगितले की, मानवाधिकार आयोगाला आम्ही तक्रार दिली आहे. संतोष देशमुख प्रकरणी तपास होण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. सोनावणे यांनी दोन पोलिस अधिकाऱ्यांचे सीडीआर तपासले गेले पाहिजेत अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता ते दोन पोलिस अधिकारी कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. आयोगाने दखल घेतली की सर्व चौकशी होईल, असे ते म्हणाले.
देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांचा मदतीचा हात
दरम्यान, सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना माजलगावकरांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या मदत फेरीतून तब्बल 43 लाख रुपये जमा झाले. सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसाठी माजलगावकरांनी पुढाकार घेत माजलगाव तालुक्यातून जमा झालेला निधी आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीत सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला. 9 डिसेंबर रोजी मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. या हत्यानंतर देशमुख कुटुंब यांना आधार मिळावा यासाठी माजलगाव शहरात मदत फेरी काढून व्यापारी प्रतिष्ठित नागरिक यांनी मदतीचा हात दिला. हा निधी मस्साजोग गावात जाऊन आमदार प्रकाश सोळंके यांच्यासह माजलगावातील नागरिकांनी सुपूर्द केला.
तोपर्यंत मंत्रीपदावरून बाजूला करावे
दरम्यान, देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील तपास पथकात काही लोकांची बदली वाल्मिक कराडने केली होती म्हणून आम्ही त्यांची नावे घेतली असल्याचे आमदार सुरेश धस यांनी म्हटले आहे. एसआयटीवर आमचा आक्षेप नाही, पण यामधील क्लास थ्रीमधील काही कर्मचाऱ्यावर आमचा आक्षेप असल्याचे धस यांनी म्हटले आहे. करुणा मुंडेच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवणारा हा सुद्धा पोलीस दलातील व्यक्ती होता तो मला माहीत असल्याचा दावाही त्यांनी केला. बिंदू नामावली प्रमाणेच जिल्ह्यात कर्मचारी राहणार असल्याचे ते म्हणाले. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्यांना मंत्री पदापासून बाजूला करावे असे मला वाटते, असेही धस यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या