Beating Retreat Ceremony : नवी दिल्लीच्या ऐतिहासिक विजय चौकात आज सशस्त्र दलांचे सर्वोच्च कमांडर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत 'बीटिंग द रिट्रीट' सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात पहिल्यांदाच होणारे ड्रोन प्रदर्शन, या वर्षीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक असेल. 'आझादी का अमृत महोत्सव' म्हणून साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ उत्सवाचा एक भाग असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 'मेक इन इंडिया' उपक्रमांतर्गत या प्रदर्शनाची संकल्पना आणि रचना, निर्मिती आणि नृत्यदिग्दर्शन करण्यात आले आहे. 


'बीटिंग द रिट्रीट' ही शतकानुशतके जुनी लष्करी परंपरा 
विशेष म्हणजे "बीटिंग द रिट्रीट" ही एक जुनी लष्करी परंपरा आहे. पूर्वीच्या युद्धांमध्ये सूर्यास्त झाला की युद्ध थांबवले जायचे, ते थांबल्याची धून वाजवली जायची आणि मग दोन्ही बाजूंचे सैन्य त्यांच्या छावणीमध्ये परतायचे. या जुन्या पद्धतीवरुन 'बीटिंग द रिट्रिट' या सोहळ्याची संकल्पना रचण्यात आली आहे. जगभरातल्या अनेक देशांच्या सैन्यदलांचा असा कार्यक्रम होतो. भारतानेही प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ही परंपरा सामील केली आहे. म्हणजे आता सैन्यदलांचे प्रमुख राष्ट्रपती हा सोहळा समाप्तीनंतर सैन्याला त्यांच्या छावणीमध्ये परतायला सांगतात.


या वर्षी बीटिंग द रिट्रिटमध्ये अनेक नवीन धून
या वर्षी बीटिंग द रिट्रिटमध्ये भारतीय लष्कर, नौदल, वायुसेना आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या बँडद्वारे संगीतासह एकूण 26 सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील. त्याचबरोबर सुरुवातीचा बँड 'वीर सैनिक'ची धून वाजवणारा मास बँड असेल. त्यानंतर पाईप्स आणि ड्रम्स बँड, सीएपीएफ बँड, एअर फोर्स बँड, नेव्हल बँड, आर्मी मिलिटरी बँड आणि मास बँड असेल. कमांडर विजय चार्ल्स डिक्रूझ हे या सोहळ्याचे मुख्य संचालक असतील. 'आझादी का अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी या उत्सवात अनेक नवीन धून असणार आहेत. यामध्ये, 'हिंद की सेना' आणि 'ए मेरे वतन के लोगों'चा समावेश आहे. तसेच 'सारे जहाँ से अच्छा' या लोकप्रिय धूनने कार्यक्रमाची समाप्ती होईल.


1000 ड्रोनचा खास शो
यंदा पहिल्यांदाच  बीटिंग द रिट्रीट सोहळ्यामध्ये आयआयटी दिल्ली आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने स्टार्टअप 'बोटलॅब डायनॅमिक्स' द्वारे ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे. हा ड्रोन शो 10 मिनिटांचा असेल. यामध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या सुमारे एक हजार ड्रोनचा समावेश असेल. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha