जम्मू : पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने (BAT) नियंत्रण रेषेवर गुरुवारी पुन्हा एकदा भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन सुपुत्र शहीद झाले. या हल्ल्यात बॅट हल्लेखोरांनी भारतीय सैनिकांना खेचून घेण्यासाठी जाळं आणि चाकू वापरल्याची माहिती पुढे येत आहे. तसंच यावेळी या हल्ल्याचं पाकिस्तानी सैनिकांकडून व्हिडीओ रेकॉर्डिंगही केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.
पाकिस्तानच्या बॅट जवानांच्या तुकडीने परवा भारतीय हद्दीत घुसखोरी करून केलेल्या हल्ल्यात, दोन भारतीय जवान शहीद झाले, तर भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात बॅट तुकडीचा एक सैनिक ठार तर दुसरा गंभीर जखमी झाला. ठार झालेल्या बॅट जवानाची पाहणी केल्यावर त्याच्या डोक्याला व्हिडिओ कॅमेरा आणि जवळ माणसांना खेचायचा सापळा असल्याचं स्पष्ट झालं. कंठस्नान घातलेल्या घुसखोराचा मृतदेह भारतीय लष्कराने ताब्यात घेतला असून, त्याच्याकडून खंजीर, चाकू, एके रायफल्स, 3 मॅगेझिन, 2 ग्रॅनेड, अशी शस्त्रे मिळाली. तसंच त्यासोबत एक हेडबँड कॅमेरा मिळाल्याचंही त्या अधिकाऱ्याने यावेळी सांगितलं.
भारताकडून सातत्यानं मात खाणाऱ्या पाकिस्तानने भ्याड हल्ले करण्याचं सत्र सुरु केलं आहे. या हल्ल्यासाठी पाकिस्तान लष्कराच्या बॉर्डर अॅक्शन टीमने भारतीय जवानांना खेचण्यासाठी एक विशिष्ठ प्रकारचं जाळं तयार केलं असून, त्याद्वारे ते भारतीय जवानांना खेचून त्यांची हत्या करत आहेत. यानंतर ते भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करत असल्याची माहिती भारतीय लष्कराच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
या बॅट टीममध्ये केवळ पाकिस्तानच्या लष्करी जवानांचाच समावेश असतो असे नव्हे, तर काही दहशतवाद्यांचाही समावेश असतो. या दहशतवाद्यांना लष्करी तळावर हल्ला करण्यासाठीच खास प्रशिक्षण दिलं जातं, असंही या अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं.
वास्तविक, कोणत्याही देशाचा जवान सीमेचं रक्षण करताना धारातीर्थी पडल्यास, त्याचा शत्रू सैन्यातील जवान मान राखत त्याला श्रद्धांजली अर्पण करतो. पण पाकिस्तानच्या बॅट टीमनं सातत्यानं मानवी सभ्यतेच्या सर्व मर्यादा पार केल्याचं बॅटच्या हल्ल्यातून समोर येत आहे.
कारण बॅट टीमच्या हल्ल्यात शत्रू सैन्याच्या जवानाची हत्या केल्यानंतर, त्याच्या मृतदेहाची विटंबना केल्याच्या घटना गेल्या काही दिवसात समोर आल्यात आहेत. यामध्ये 1 मे रोजी पुंछ जिल्ह्यातल्या हल्ल्याचा समावेश आहे. या हल्ल्यातही दोन भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच बॅटच्या घुसखोरांनी भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना केली होती.
तर 2013 मध्ये शहीद जवान हेमराज यांचीही अशाच प्रकारे बॅट हल्लेखोरांनी हत्या करुन, त्याच्या मृतदेहाची विटंबना केली होती. फेब्रुवारी महिन्यातही अशाच प्रकारचा हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण बॅट टीमचा हा कट भारतीय जवानांनी उधळून लावल्याची माहिती अधिकाऱ्याने पीटीआयला दिली.
दरम्यान, पाकिस्तानी सैनिकांकडून भारतीय जवानांच्या मृतदेहाची विटंबना करण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढले आहेत. भारतीय जवानाचं शीर कापून नेण्याचे प्रकार ही उजेडात आले आहेत. त्यामागे पाकिस्तानी लष्कराची बॉर्डर अक्शन टीम असल्याचं स्पष्ट झालंय. त्यामुळे पाकिस्तानच्या या कृत्याने भारतीय जनमानसात संतापाची लाट आहे.
संबंधित बातम्या
पाक लष्कराच्या हल्ल्यात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद