Basavaraj Bommai Resigns: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी अखेर आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. आज रात्री, त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तर, दुसरीकडे स्पष्ट बहुमत मिळवलेल्या काँग्रेस आमदारांची रविवारी बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत विधिमंडळाचा गट नेता ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. 


कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे आज निकाल जाहीर झाले. काँग्रेसने 224 विधानसभा जागांपैकी 136 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवला. राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजपच्या दिग्गजांनी प्रचार केला होता. त्यानंतरही भाजपचा मोठा पराभव झाला. 


बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आम्ही हा जनादेश स्वीकारला आहे. आमच्यातील उणीवा दूर करून पुन्हा एकदा पक्ष संघटना उभी करू आणि लोकसभेत यश मिळवू असे बोम्मई यांनी म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिष्मा कमी झाला नसल्याचेही त्यांनी सांगितले. कदाचित काँग्रेसने आमच्यापेक्षा अधिक चांगले प्रयत्न आणि रणनीती आखल्याने त्यांनी यश मिळवले असू शकते, असेही बोम्मई यांनी म्हटले. 


कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरमैय्या यांच्या नेतृत्त्वात काँग्रेसने स्थानिक मुद्यांवर निवडणूक लढवली. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात पीएफआयसोबत बजरंग दलावरही बंदी घालण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यावरून भाजप आक्रमक झाली होती. मात्र, काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील राज्य सरकारचा भ्रष्टाचार आणि स्थानिक मुद्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. त्याशिवाय काँग्रेसने आपल्या पाच आश्वासनांवर भर दिला होता. 


निवडणूक निकालानंतर आज संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत डी. के. शिवकुमार, सिद्धरमैय्या, के.सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आदी नेते सहभागी झाले होते. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पक्ष कार्यालयात जात कार्यकर्त्यांना संबोधित केले. 


कर्नाटकचे काँग्रेस प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला म्हणाले की, कर्नाटकने इतिहास रचला आहे. कर्नाटकने केवळ कर्नाटकातील जनतेलाच नव्हे तर संपूर्ण देशाला लोकशाहीला नवसंजीवनी दिली आहे. हा प्रत्येक कन्नडिगांचा विजय आहे. कर्नाटकने लोकशाही वाचवण्याचा नवा मंत्र दिला आहे. संपूर्ण भारतात लोकशाही आणि संविधान वाचवण्याचा हा मार्ग आहे. पंतप्रधान म्हणाले 'काँग्रेस मुक्त भारत' पण कर्नाटकच्या लोकांनी 'भाजप मुक्त दक्षिण भारत' केले. लोकांनी प्रेमाची दुकाने उघडली आणि द्वेषाची दुकाने बंद केली असल्याचे त्यांनी म्हटले. 


भाजपमुक्त दक्षिण भारत: मल्लिकार्जुन खर्गे 


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, हा मोठा विजय आहे. भाजप आम्हाला टोमणे मारत असे आणि आम्ही 'काँग्रेसमुक्त भारत' बनवू. परंतु आता 'दक्षिण भारत भाजपमुक्त' आहे.


अहंकार जास्त काळ टिकत नाही, असेही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. ही लोकशाही आहे आणि आपल्याला जनतेचे ऐकावे लागेल आणि जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतील त्यांच्यापुढे नतमस्तक झाले पाहिजे. हा कोणाचा विजय नसून राज्यातील जनतेचा विजय आहे. त्यांच्यामुळे आपल्या 136 जागांवर विजय मिळाला असल्याचे खर्गे यांनी सांगितले.