नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईमध्ये पु्न्हा दहावी बोर्डाची परीक्षा सुरु होणार आहे. 2017-18 या शैक्षणिक वर्षात सीबीएसईमध्ये दहावी बोर्डाची परीक्षा होईल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात घोषणा केली.


दहावी बोर्डाची परीक्षा अनिवार्य करण्याचे संकेत सरकारने यापूर्वीच दिले होते. आता जावडेकर यांनी दहावीच्या परीक्षेतून ग्रेडिंग सिस्टम हटवण्याचं म्हटलं होतं. या घोषणेसह आता 2018 पासून दहावी बोर्डाची परीक्षा होणार आहे.

तत्कालीन केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी सीबीएसईची दहावीची परीक्षा बंद करुन वर्षभराच्या आधारावर ग्रेडिंग पद्धत सुरु केली होती. सीबीएसईच्या बोर्ड परीक्षा दहावीऐवजी बारावीत घेण्याचा निर्णय झाला आहे. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण येऊ नये हा त्यामागचा उद्देश होता.

परंतु बोर्डाची परीक्षा न घेतल्याने अभ्यासाचा दर्ज घसरत आहे, अशी तक्रार अनेक पालकांनी केली. केंद्र सरकारने एका समितीची स्थापना केली होती. या समितीने सीबीएसईमध्ये दहावी बोर्डाची परीक्षेचा निर्णय घेतला आहे.