मुंबई : रविवारच्या सुट्टीमुळे आज ग्राहकांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत. त्यामुळे एटीएम, पेट्रोल पंप आणि मॉल्स, किंवा स्वाईप मशिन्स असलेल्या दुकानातून तुम्हाला दोन हजार रुपयांपर्यंतचीच रक्कम काढता येणार आहे.


नोटाबंदीच्या निर्णयाचा आजचा बारावा दिवस आहे. अनेक एटीएममध्ये पैशांचा खडखडाट असल्याचं म्हटलं जात आहे. बँका आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा कायम आहेत. शनिवारी बँकांतून केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच पैसे काढता येणार होते, तर रविवारी बँका बंद असल्यामुळे दोन दिवस सामान्य नागरिकांना बँकेतून पैसे काढता आलेले नाहीत. गेल्या शनिवार-रविवार मात्र बँका उघड्या ठेवण्यात आल्या होत्या.

कपड्यांची दुकानं, शॉपिंग मॉल्स यासारख्या मोठ्या दुकानांतील स्वाईप मशिनमधून तुम्ही रोख दोन हजार रुपये काढू शकणार आहात. 30 डिसेंबरपर्यंत कोणतेही ट्रान्जॅक्शन चार्जेस पडणार नाहीत.

दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच बदलता येणार आहेत. याचा अर्थ दोन हजारापेक्षा जास्त रकमेच्या हजार-पाचशेच्या नोटा तुमच्याकडे असतील, तर त्या वाया जाणार असा होत नाही. तुम्ही हे पैसे बँकेत तुमच्या खात्यावर जमा करु शकता. त्यानंतर सोयीनुसार एटीएममधून ही रक्कम काढू शकता.