मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याच्या निर्णयावर टीका केली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचं समर्थन करत त्यांना सलाम केला.


काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी न घाबरता सामान्य लोकांची भावना व्यक्त केल्याबद्दल त्यांना सलाम करतो. नोटा रद्द करण्याचा निर्णयाचा त्रास कष्टकऱ्यांना जास्त झाला आहे.", असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करुन म्हटले.


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अचानक नोटा रद्द करण्याचा निर्णय चुकीचा आहे. नोटा बदलण्यासाठी मुदत वाढवायला हवी, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं. मोदींनी अचानक नोटा बदलून लोकांच्या विश्वासाची प्रतारणा केली, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला.

स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही. मात्र अचानक नोटा रद्द केल्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. 500-1000 रुपयांच्या नोटांवर सर्जिकल स्ट्राईक केला, मग स्वीस बँकेवर सर्जिकल स्ट्राईक कधी?” तसंच नोटा बदलण्याला विरोध नाही, नागरिकांना होणारा त्रास थांबवा, नोटा बदलण्याची मुदत वाढवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले.