मुंबई : बँक कर्मचाऱ्यांचा आज (22 ऑक्टोबर) देशव्यापी संप आहे. विलीनीकरणाचा विरोध आणि इतर मागण्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपाला भारतीय मजदूर संघाचा विरोध असून, डाव्या संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. प्रस्तावित संपाच्या दिवशी सुरळीत कामकाजासाठी बँकेने आवश्‍यक ती पावलं उचलली आहेत. मात्र तरीही कामकाजावर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. या बँकांचं विलीनीकरण केंद्र सरकारने देशातील दहा बँकांचे विलीनीकरण करुन चार मोठ्या बँका करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युनायटेड बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँकेचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण होईल. तर सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, अलाहबाद बँक इंडियन बँकेत आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत विलीन होईल. परंतु या विलीनीकरणाला महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन, बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांनी विरोध दर्शवला आहे. सरकारच्या निर्णयाच्या विरोधात बँक कर्मचारी धरणं आंदोलन करणार आहेत. यापूर्वी दोन वेळा बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी आंदोलन, संप पुकारुन निषेध नोंदवला आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या मागण्या - कर्मचाऱ्यांच्या मागण्यांमध्ये विलीनीकरण होऊ नये - पाच दिवसांचा आठवडा करावा - रोख व्यवहारांसाठीची वेळ कमी करावी - आरबीआयच्या नियमानुसार निवृत्तीवेतन द्यावं - बँकांमध्ये नोकरभरती करावी - एनपीएस रद्द करावा - ग्राहकांसाठीच्या सेवाशुल्कात कपात करावी - वेतन आणि पगारात बदल करावे