नवी दिल्ली : तुम्ही आज बँकेत काही महत्त्वाचे काम मार्गी लावण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारी बँकांना खासगी क्षेत्राकडे सोपवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयविरोधार सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या देशव्यापी संपावर असणार आहेत. त्याचबरोबर तेल आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किंमतींविरूद्ध शेतकरी आणि कामगार संघटनाही आज रस्त्यावर उतरतील. शेतकरी आज कॉर्पोरेट विरोध दिन साजरा करतील.


बँकांच्या संपाविषयी सांगायचं तर या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले होते की दोन सरकारी बँका आणि विमा कंपनीचं यावर्षी खासगीकरण करण्यात येईल. सरकारच्या या निर्णयाविरोधात 9 राज्य बॅंकांच्या संघटना, युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सोमवारी आणि मंगळवारी संपाची घोषणा केली आहे.


या संपामुळे बँकांचे 10 लाख कर्मचारी दोन दिवस कामावर येणार नाहीत. त्यामुळे बँकांच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. गेल्या 4 वर्षात 14 सार्वजनिक बँका विलीनीकरण करण्यात आलं आहे. सध्या देशात 12 सरकारी बँका आहेत. मात्र दोन बँकांचं खासगीकरण झालं तर त्यांची संख्या 10 वर येईल. दोन्ही बँकांचे खाजगीकरण 2021-22 या आर्थिक वर्षात केले जाईल असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.


BOI Recruitment 2021: BOI मध्ये Assistant, Attendant आणि वॉचमनची भरती, आठवी ते दहावी पास व्यक्ती करु शकतात अर्ज


दोन दिवसीय संपामुळे ठेवी आणि पैसे काढणे, चेक क्लिअरन्स आणि कर्ज स्वीकृती यासारख्या सेवांवर परिणाम होऊ शकतो. भारतीय स्टेट बँक (एसबीआय) यांच्यासह अनेक सरकारी बँकांनी आपल्या ग्राहकांना माहिती दिली आहे की संप झाल्यास त्यांच्या सामान्य कामकाजावर शाखा आणि कार्यालयांमध्ये परिणाम होऊ शकतो. बँकांच्या माहितीनुसार बँक शाखा आणि कार्यालये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेचे (एआयबीईए) सरचिटणीस सी.एच. वेंकटाचलम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अतिरिक्त मुख्य कामगार आयुक्तांसोबत 4, 9 आणि 10 मार्च रोजी आयोजित बैठका अनिर्णीत राहिल्याने संप होईल.


यूएफबीयूच्या सदस्यांमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (एआयबीईए), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कन्फेडरेशन (एआयबीओसी), नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज (एनसीबीई), ऑल इंडिया बँक ऑफिसर असोसिएशन (एआयबीओए) आणि बँक एम्प्लॉईज कन्फेडरेशन ऑफ इंडिया (बीईसीआय) इत्यादींचा समावेश आहे. इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉईज फेडरेशन (आयएनबीईएफ), इंडियन नॅशनल बँक ऑफिसर कॉंग्रेस (आयएनबीओसी), नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स (एनओबीडब्ल्यू) आणि नेशन ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर (एनओबीओ) या संपात सहभागी आहेत.