म्हापसा (गोवा) : गोव्यातील म्हापसा येथे इंडियन ओवरसीस बँकेच्या शाखेवर पाच दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल (शुक्रवार) संध्याकाळी घडली.


पाच दरोडेखोरांनी जबरदस्तीने बँकेत प्रवेश करुन शाखा व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल रोखून बँक लुटण्याचा प्रयत्न केला. यावेळी दरोडेखोरांनी बँकेतील लोकांना आतमध्येच डांबून ठेवलं. याचवेळी एका दरोडेखोराने हवेत गोळीबार करुन लोकांना घाबरवण्याचा प्रयत्नही केला. दरोडेखोरांनी  बँकेतील रोख रक्कम व दागिने लुटण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, यावेळी बँकेबाहेर असलेल्या सतर्क लोकांनी आत घुसलेल्या दरोडेखोरांवर थेट दगडफेक सुरु केली. अचानक झालेल्या दगडफेकीमुळे घाबरलेल्या दरोडेखोरांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्यात दोघेजण बाहेर असलेल्या नागरिकांच्या तावडीत सापडले. नागरिकांनी दोघांना  चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर इतर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी ठरले.

गेल्या वर्षी म्हापसा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘बँक ऑफ इंडिया’च्या शाखेवर दरोडा टाकून सुमारे २० लाख रुपयांची रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केली होती. या दरोड्यातील काही जणांना अटक करण्यात आली असली तरी रोख रक्कम अद्याप सापडलेली नाही.