मुंबई : स्वस्त लोनच्या शर्यतीत बँक ऑफ बडोदाने, सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि सर्व खासगी बँकांना मागे टाकलं आहे. बँक ऑफ बडोदा ही सर्वात कमी व्याजदराने गृहकर्ज देणारी बँक ठरली आहे.
बँक ऑफ बडोदा अवघ्या 8.35% व्याजदराने गृहकर्ज देत आहे, जो या क्षेत्रात सर्वात कमी दर आहे. देशातली सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियालाही आजपर्यंत एवढ्या कमी व्याजदरात गृहकर्ज उपलब्ध करून देता आलेलं नाही.
बँक ऑफ इंडिया स्वस्त व्याजदराने ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. बँकेने जुन्या होमलोन ग्राहकांना त्याचं कर्ज नवीन व्याजदरात रुपांतरीत करुन घेण्यासाठी आवश्यक चार्जही माफ केला आहे.
"एमसीएलआरमध्ये 0.55-0.75 टक्क्यांच्या कपातीनंतर बँकेने 7 जानेवारीपासून गृहकर्जाचा व्याजदर 0.70 टक्क्यांनी कमी केला आहे. बँक सर्वात कमी व्याजदरात गृहकर्ज देत आहे," असं बँक ऑफ इंडियाच्या एका परिपत्रकात म्हटलं आहे.
बँक ऑफ बडोदाने एका वर्षाच्या एमसीएलआर दरात कपात करुन 8.35 टक्के केला आहे. यापूर्वी हा दर 9.05 टक्के होता.
जर तुम्ही 50 लाखांचं गृहकर्ज घेतलं असेल, तर बँक ऑफ बडोदाच्या 0.70 टक्के व्याजदराने प्रत्येक महिन्याच्या हफ्त्यात 2496 रुपये कमी द्यावे लागणार. तर 30 वर्षांपर्यंत कर्जाच्या संपूर्ण मुदतीत तुम्ही 9 लाख रुपयांची बचत करु शकता.
बँक 8.85 टक्क्यांच्या व्याजदराने कार लोन देत आहे. तर लोन अगेन्स्ट प्रॉपर्टीवर बँकेचा व्याजदर 10.35 टक्के आहे.
दुसरीकडे, एसबीआय गृहकर्ज घेणाऱ्या महिलांना 75 लाखांच्या कर्जावर 8.65 टक्क्यांच्या व्याजदराची ऑफर देत आहे. एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि इंडियाबुल्स महिलासाठी 8.65 टक्के आणि इतर कर्जदारांना 8.7 टक्क्यांवर 75 लाखांचं गृहकर्ज देत आहे.