मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या संपामुळे शुक्रवारपासून सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. 1 फेब्रुवारीला पहिला शनिवार असल्याने बँकांसाठी तो कामकाजाचा दिवस आहे. पण बँक कर्मचारी संपावर ठाम असल्याने शुक्रवार ते रविवार सलग तीन दिवस बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे.
बँक कर्मचाऱ्यांची 'इंडियन बँक असोसिएशन' सोबत वेतन करार आणि इतर मागण्यांसंदर्भात चर्चा झाली होती. परंतु ही चर्चा फिस्कटल्यामुळे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (बँक कर्मचारी संघटना) दोन दिवसीय संपाची हाक दिली आहे.
बँक कर्मचाऱ्यांनी 12.25 टक्के वेतनवाढीची मागणी केली होती. ती मागणी सरकारने मान्य न केल्यामुळे ही चर्चा फिस्कटली. या मागणीसह कर्मचाऱ्यांसाठी विशेष भत्ते आणि कायम स्वरूपी पाच दिवसांचा आठवडा (फाईव्ह डे वीक) या मागण्या मांडल्या होत्या. तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण आणि एकत्रीकरणाला बँक कमर्चाऱ्यांचा विरोध आहे.
या संपामुळे बँक ग्राहकांना बँकेशी संबंधित कामं गुरुवारपर्यंत उरकावी लागणार आहेत. अन्यथा त्या ग्राहकांना सोमवारची वाट पाहावी लागेल. 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. परंतु तरीदेखील कर्मचारी संपावर असल्याने त्या दिवशी बँका बंद राहणार आहेत.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 31 जानेवारी रोजी संसदेत आर्थिक पाहणी अहवाल सादर करणार आहेत. त्याच्या दुसऱ्या दिवशी (शनिवारी )1 फेब्रुवारी रोजी त्या अर्थसंकल्प मांडतील.
दरम्यान, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मार्च महिन्यात पुन्हा एकदा तीन दिवसांचा संप पुकारु असा इशारी बँक कर्मचाऱ्यांनी दिला आहे.