नवी दिल्ली: इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू 6 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी आणि नेतन्याहू यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा होणार आहे.

दरम्यान, इस्रायलच्या पंतप्रधानांसोबत बेबी मोशेही मोदींच्या भेटीला आला आहे. बेबी मोशे हा तोच मुलगा आहे ज्याने 2008 मधील मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या आई वडिलांन गमावलं होतं.

पंतप्रधान मोदी मागच्या वर्षी जुलै महिन्यात इस्रायलला गेले होते तेव्हा त्यांनी या बेबी मोशेची भेट घेतली होती आणि मोशेला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर मोशेनंही मुंबईतील नरिमन हाऊस बघण्याची इच्छा व्यक्त केली होती.

2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात नरिमन हाऊसही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होतं. इथेच मोशेचे आई वडील मारले गेले. पण मोशे या दहशतवादी हल्ल्यात वाचला.

दुर्दैव हे की आपल्या मृत आई वडिलांशेजारी तो कितीतरी वेळ तसाच बसून होता. त्यांनतर त्याच्या आजीने त्याला उचलून इमारतीबाहेर नेलं होतं. त्याच नरिमन हाऊसमध्ये तब्बल 9 वर्षानंतर मोशे इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहूंसोबत एका कार्यक्रमात जाणार आहे.

काय घडलं होतं त्या काळरात्री

अतिरेक्यांनी ज्या छबाद हाऊसवर हल्ला केला. त्याच इमारतीतून सहीसलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. मोशे आणि सँड्रा...

बेबी मोशे आपले वडील गॅव्रिएल आणि आई रिवका यांच्यासोबत होता. अतिरेकी थेट इमारतीत घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. पहिल्याच हल्ल्यात मोशे अनाथ झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मात्या-पित्यांच्या मृतदेहासमोर बसून मोशे रडत होता. पण त्याचवेळी मोशेसाठी धावून आली त्याची केअरटेकर सँड्रा.

बेबी मोशेला आपल्या छातीशी कवटाळून सँड्रा लपून बसली. पण बाहेर गोळीबाराच्या फैरी झडतच होत्या. घमासान सुरुच होतं. एनएसजी गार्ड्स दाखल झाले आणि तब्बल 24 तासांच्या थरारानंतर या दोघांची सुटका झाली.

आई-वडिलांवरच्या अंत्यसंस्कारानंतर मोशे आजी आजोबांकडे इस्त्रायलला गेला. सोबत मोशेला वाचवणारी सँड्राही तिथेच स्थिरावली. मोशे आता इस्त्रायलचा नागरिक आहे. सँड्रालाही नागरिकता बहाल करण्यात आली आहे. दोघेही सुखात आहेत फक्त त्या काळरात्रीच्या आठवणी मनात साठवून...

संबंधित बातम्या

माझं तुमच्यावर आणि भारतीयांवर प्रेम आहे : मोशे

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर इस्त्रायलच्या पंतप्रधानांचं दिल्लीत आगमन