नागपूर : योगगुरु रामदेव बाबांनी पतंजलीच्या माध्यमातून गारमेंटच्या क्षेत्रातही पाऊल ठेवले आहे. यात सर्वप्रथम परिधान नावाने स्वदेशी जीन्स पॅन्ट बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. पतंजलीकडून कपड्यांच्या निर्मितीसाठी 10 प्लॅन्टही उभारले जाणार आहेत.
"स्वदेशी वेशभूषा हे आमचं ध्येय आहे. पण त्यासोबतच आम्ही विदेशी वेशभूषेला स्वदेशी बनवणार आहोत, त्यासाठी स्वदेशी जीन्स बनवून बाजारात आणण्याचा विचार केला आहे," असं पतंजलीकडून नागपुरात झालेल्या मीट द प्रेसमध्ये सांगण्यात आलं. सोबतच लवकरच स्वदेशी शूज बाजारात आणण्याचा विचार असल्याचंही पतंजलीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
येत्या एक ते दीड वर्षात पतंजलीची वार्षिक उलाढाल 50 हजार कोटींच्या घरात जाणार आहे. त्यामुळे पतंजली हिंदुस्तान युनिलिव्हर, कोलगेट, पेप्सी, कोकाकोला, आणि प्रोक्टर अँड गॅम्बलच्या तुलनेत मोठी कंपनी असेल असंही यावेळी सांगण्यात आलं. पतंजलीने मिळणारा 100 टक्के नफा सामाजिक कार्यात लावणार असल्याचं म्हटलं आहे.