Ramdev Baba : पतंजलीच्या (Patanjali) उत्पादनांमध्ये भेसळ होत असल्याच्या आरोपांना बाबा रामदेव (Baba Ramdev) यांनी उत्तर दिलंय. पतंजलीच्या बदनामीसाठी काही लोकांकडून षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप बाबा रामदेव यांनी केलाय. बाबा रामदेव यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पतंजलीवर होणाऱ्या भेसळीच्या आरोपांना उत्ततर दिलंय.


"काही लोक पतंजली आणि बाबा रामदेव यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.  गेल्या दोन ते तीन दशकांपासून लोक मला ओळखत आहेत. परंतु, अलीकडे पतंजलीविरोधात प्रचार केला जातोय. परंतु, अशा लोकांना मी सोडणार नाही. पतंजलीची बदनामी करणाऱ्या जवळपास 90 लोकांना कायदेशीर नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी बाबा रामदेव यांनी दिली. 


बाबा रामदेव म्हणाले, " मार्केटमध्ये नाव कमवण्यासाठी खूप वर्षे लागतात. परंतु, हे नाव खराब करण्यासाठी काही क्षण लागतात. एखाद्या आरोपामुळे अनेक वर्षांपासून तयार केलेली ओळख अगदी काही क्षणात ढासळते. अनेक लोकांना पतंजलीची प्रगती सहन होत नाही. त्यामुळे पतंजलीला बदनाम करण्यासाठी पतंजलीच्या उत्पादनांमध्ये भेसळ करण्यात येत असल्याचे खोटे आरोप केले जात आहेत. परंतु, हे सर्व आरोप पूर्ण पणे खोटे आहेत. रूची सोयाची 4300 कोटींमध्ये खरेदी केली केली होती. तीच आज जवळपास 50 हजार कोटींची उलाढाल असलेली कंपनी बनली आहे. 2047 ला भारताला स्वतंत्र होऊन शंभर वर्षे पूर्ण होत आहेत, त्यावेळी हीच उलाढाल शंभर कोटींच्या जवळ असेल. 


"पतंजली ग्रुपची सध्या 40 हजार कोटींची उलाढाल आहे. पुढील पाच वर्षात ही उलाढाल शंभर कोटी होईल. या शिवाय येणाऱ्या काही वर्षात आमच्या ग्रुपमध्ये पतंजली आयुर्वेदीक, पतंजली वेलनेस या नावांचा समावेश होईल. शिवाय आम्ही माध्यम क्षेत्रात देखील येत आहोत, अशी माहिती बाबा रामदेव यांनी दिली. 


बाबा रामदेव म्हणाले, आमच्या कोणत्याही उत्पादनात भेसळ नाही. परंतु, स्पर्धेक कंपन्यांकडून बदनामी करण्यासाठी खोटा प्रचार केला जातोय. सध्याच्या परिस्थितीत माध्यमांमध्ये देखीम पतंजलीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा केलं जातंय. बाबा रामदेव हा काही दहशतवादी नाही. परंतु, समाजात आमच्याबाबत वाईट पद्धतीने प्रचार केला जातोय. पतंजली खाद्य तेलाचे काही नमुने अधिकृत लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. गाझियाबादमधील एका लॅबने आम्ही पाठवलेल्या नमुन्याची तपासणी करून या पेक्षा शुद्ध तेल इतर कोणत्याच कंपनीचं नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लोक आता स्वत:च समजून जातील की पतंजलीला बदनाम करण्यासाठी कसे षडयंत्र रचले जात आहे.