मथुरा : हत्तीवर बसून योग करणं योगगुरु रामदेव बाबांना चांगलंच भारी पडलं. कारण हत्तीवर योग करताना रामदेव बाबा खाली कोसळले. रामदेव हत्तीवर बसून प्राणायाम करत होते. परंतु हत्तीने हालचाल केल्याने त्यांचा बॅलन्स गेला आणि ते हत्तीवरुन खाली पडले. या घटनेत त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही, परंतु एका क्षणासाठी तिथे उपस्थित लोक घाबरुन गेले.


बाबा रामदेव यांनी मथुरेतील महावन रमणरेतीमध्ये असलेल्या कार्ष्णि गुरु शरणानंद महाराजांच्या आश्रमात योग शिबीर आयोजित केलं होतं. यावेळी रामदेव बाबांनी आश्रमातील संतांना योग शिकवला. मंचावर असलेल्या गुरु शरणानंद महाराज यांनीही योगासनं केली होती. यावेळी रामदेव बाबा हत्तीवर बसून योग करत होते. पण हत्तीने हालचाल करताच रामदेव बाबांचा बॅनल्स गेला आणि ते हत्तीच्या पाठीवरुन घसरले.


रमणरेती आश्रमात वाळू असल्याने पडल्यावर त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. ते त्वरित उभे राहून हसू लागले. मात्र हत्तीवरुन खाली पडल्याने तिथे उपस्थित सर्व संत-महंत आणि भाविकांच्या काळजाचा ठोका चुकला.





या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ सोमवारचा (12 ऑक्टोबर) असल्याचं सांगितलं जात आहे.