B Sudarshan Reddy  नवी दिल्ली :  इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यामुळं उपराष्ट्रपती पदाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे स्पष्ट झालंय. आता इंडिया आघाडीकडून बी. सुदर्शन रेड्डी आणि एनडीएकडून सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झालं आहे.

Continues below advertisement


कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी? 


बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी झाला. त्यांनी बी.ए. आणि एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली आहे.27 डिसेंबर 1971 रोजी आंध्र प्रदेश बार कौन्सिल, हैदराबाद येथे वकील म्हणून कारकिर्दीला सुरुवात. त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि सिव्हिल प्रकरणांमध्ये वकिली केली. 1988-90 दरम्यान त्यांनी उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले आणि 1990 मध्ये 6 महिन्यांसाठी केंद्र सरकारचे वकील म्हणूनही सेवा दिली. त्यांनी उस्मानिया विद्यापीठासाठी कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील म्हणूनही काम पाहिले.


2 मे 1995 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 5 डिसेंबर 2005 रोजी त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आले. त्यानंतर 12 जानेवारी 2007 रोजी त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती झाली आणि ते 8 जुलै 2011 रोजी निवृत्त झाले.


इंडिया आघाडीनं बिनविरोधचा प्रस्ताव नाकारला


भाजपनं सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर बिनविरोध निवडीसाठी प्रयत्न सुरु केले होते. मात्र, विरोधी पक्षांनी भाजपचा हा प्रस्ताव नाकारला आहे. विरोधी पक्षांनी सीपी राधाकृष्णन यांच्या विरोधात उमेदवार दिला आहे. त्यामुळं आता सीपी राधाकृष्णन आणि माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत होणार हे स्पष्ट आहे.  



इंडिया आघाडीनं पत्रकार परिषद घेत उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या उमेदवाराची घोषणा केली आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सर्व विरोधी पक्षांनी सहमतीनं हे नाव निश्चित केल्याची माहिती दिली. तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार डेरेक 'ब्रायन यांनी आम आदमी पार्टीनं देखील सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला पाठिंबा दिल्याचं सांगितलं.


इंडिया आघाडीनं एनडीएनं ज्याप्रमाणं तामिळनाडूमधील सीपी राधाकृष्णन यांनी उमेदवार जाहीर करत दक्षिण भारतातील उमेदवार दिला त्याचप्रमाणे माजी न्यायमूर्ती सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे. माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांच्या उमेदवारीमुळं तेलुगु देसम पार्टी, वायआरएससीपी, भारत राष्ट्र समिती यांच्यापुढं कुणाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.


विरोधी पक्षांनी म्हटलं की एनडीएनं संघाशी संबंधित व्यक्तीला उमेदवारी दिली आहे तर आम्ही सुप्रीम कोर्टातून आलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.द्रमुकची भूमिका दक्षिण भारतातील उमेदवार असावा आणि तृणमूल काँग्रेसची भूमिका राजकारणाबाहेरील उमेदवार असावा अशी होती.