'अजान जरुरी, लाऊडस्पीकर नाही', सोनू निगमच्या ट्वीटवर अहमद पटेलांचं वक्तव्य
एबीपी माझा वेब टीम | 18 Apr 2017 01:39 PM (IST)
मुंबई: सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या 'मी मुस्लीम नाही, तरी अजानमुळे माझी झोपमोड का?' या ट्विटवरुन सर्वच स्तरामध्ये चर्चा सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याचविषयी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार आणि वरिष्ठ नेते अहमद पटेल यांनी देखील आता या प्रकरणी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अहमद पटेल यांनी ट्वीटरवरुन याबाबत आपली भूमिका मांडली. 'नमाजसाठी अजान महत्वाची आहे. पण आजच्या आधुनिक युगात लाऊडस्पीकर गरजेचं नाही.' असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं. नेमकं प्रकरण काय? 'मी मुस्लीम नाही आणि तरीही मला अजानच्या आवाजामुळे झोपेतून उठावं लागतं. भारतातील जबरदस्तीची ही धर्मिकता कधी संपेल?', असा सवाल सोनू निगमनं केला होता. शिवाय, 'मोहम्मद यांनी ज्यावेळी इस्लामची सुरुवात केली, त्या काळात वीज नव्हती. मग एडिसननंतर हा कर्कश आवाज का?', असंही सोनू निगमनं ट्वीटमधून विचारलं. “जे लोक धर्माचे अनुयायी नाहीत, त्यांना भोंगे लावून उठवणाऱ्या कोणत्याही मंदिर किंवा गुरुद्वारावर माझा अजिबात विश्वास नाही.”, असंही ट्वीट सोनू निगमनं केलं होतं. दरम्यान, सोनू निगमच्या या ट्वीटनंतर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अजान म्हणजे काय? नमाज अदा करण्याआधी मस्जिदमध्ये लोकांना बोलवण्यासाठी अजान दिली जाते. अजानचा अर्थ बोलावणं किंवा घोषणा करणं असा होतो. नमाजच्या आधी दिवसातून पाच वेळा अजान दिली जाते. संबंधित बातम्या: मशिदींवरील भोंग्यांमुळे माझी झोपमोड का? : सोनू निगम