नवी दिल्ली : राम जन्मभूमीवर राम मंदिर बांधण्यासाठी होत असलेल्या विलंबाबाबत विश्व हिंदू परिषदेनं आज अयोध्या येथे धर्मसभेचं आयोजन केलं आहे. यावेळी 11 डिसेंबरनंतर राम मंदिराबाबत काहीतरी मोठा निर्णय होणार असल्याचा दावा जगद्गुरू रामानंदाचार्यजी स्वामी राम भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका देणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे.


राम मंदिरासंबधी ही शेवटची सभा किंवा संमेलन असल्याचं विश्व हिंदू परिषदेच्या कणखर भूमिकेवरून दिसत आहे. स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी पुढे म्हटलं की, "केंद्र सरकारला 6 डिसेंबरला काहीतरी करायचं होतं, मात्र आचारसंहितेमुळे ते शक्य होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आम्हाला धोका देणार नाहीत. 11 डिसेंबरनंतर काहीतरी निर्णय नक्कीच येईल", असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


"11 डिसेंबरनंतर कदाचित राम मंदिराबाबत अध्यादेश किंवा ठोस निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकारमधील एका वरिष्ठ मंत्र्यांने नाव न सांगण्याच्या अटीवरून मला आश्वासन दिलं आहे, असा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.


"सरकारच्या एका वरिष्ठ मंत्र्यांची आणि माझी 23 नोव्हेंबरला रात्री 8.30 वाजता भेट झाली होती. राम मंदिराच्या मुद्यावर आमच्यात जवळपास 10 मिनिट चर्चा झाली. आणखी थोडी वाट पाहा असं संतांना जाऊन सांगा. लवकरच काहीतरी होईल. लवकरच अध्यादेश निघेल आणि तो अध्यादेश दोन तृतीयांश बहुमताने पास होईल", असं मंत्री महोदयांनी सांगितल्याचा दावा स्वामी भद्राचार्यजी महाराज यांनी केला आहे.