Continues below advertisement

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 25 नोव्हेंबर रोजी उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी मंदिराला भेट देणार आहेत. देशातील सामाजिक-सांस्कृतिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील हा एक महत्त्वाचा प्रसंग ठरणार आहे. सकाळी 10 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान महर्षि वसिष्ठ, महर्षि विश्वामित्र, महर्षि अगस्त्य, महर्षि वाल्मिकी, देवी अहिल्या, निषादराज गुहा आणि माता शबरी यांच्याशी संबंधित मंदिरांचा समावेश असलेल्या सप्तमंदिराला भेट देतील. यानंतर ते शेषावतार मंदिरालाही भेट देणार आहेत.

सकाळी 11 वाजताच्या सुमाराला, पंतप्रधान माता अन्नपूर्णा मंदिराला भेट देतील. यानंतर, ते राम दरबार गर्भगृहात दर्शन आणि पूजा करतील, त्यानंतर ते रामलल्ला गर्भगृहात दर्शन करतील.

Continues below advertisement

दुपारी 12 वाजण्याच्या सुमाराला, पंतप्रधान अयोध्येतील पवित्र श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या शिखरावर समारंभपूर्वक भगवा ध्वज फडकवतील. ही घटना मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्याचे आणि सांस्कृतिक उत्सव तसेच राष्ट्रीय एकात्मतेच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाल्याचे प्रतीक ठरणार आहे. या ऐतिहासिक प्रसंगी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करणार आहेत.

हा कार्यक्रम मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या शुभ पंचमीला होईल, ही तिथी श्रीराम आणि सीतामाता यांच्या विवाह पंचमीच्या अभिजित मुहूर्ताशी देखील जुळत असून, हा दिवस दिव्य मिलनाचे प्रतीक आहे. याशिवाय यादिवशी नववे शीख गुरु तेग बहादुरजी यांचा हौतात्म्य दिन देखील आहे, गुरु तेग बहादुरजी यांनी 17 व्या शतकात अयोध्येत 48 तास अखंड ध्यान केले होते, त्यामुळे या दिवसाचे आध्यात्मिक महत्त्व आणखी वाढते.

Ram Mandir Ayodhya : कसा आहे भगवा ध्वज?

राम मंदिरावर फडकवण्यात येणारा ध्वज हा काटकोन त्रिकोणी ध्वज असून त्याची उंची दहा फूट तर लांबी वीस फूट आहे, या ध्वजावर तेजस्वी सूर्याची प्रतिमा असून ती भगवान श्रीराम यांचे अलौकिक तेज आणि शौर्याचे प्रतीक आहे. त्यावर कोविदार वृक्षाच्या प्रतिमेसह 'ओम' कोरलेला आहे. हा पवित्र भगवा ध्वज रामराज्यातील आदर्शांना मूर्त रूप देत प्रतिष्ठा, एकता आणि सांस्कृतिक वारशाचा संदेश देईल.

हा ध्वज पारंपरिक उत्तर भारतीय नागर स्थापत्य शैलीत बांधलेल्या शिखरावर फडकेल, तर दक्षिण भारतीय स्थापत्य परंपरेनुसार रचना केलेले मंदिराभोवती बांधलेले 800 मीटरचे परकोटा, हे प्रदक्षिणागृह, मंदिराच्या स्थापत्यकलेतील विविधतेचे दर्शन घडवते.

मुख्य मंदिराच्या बाह्य भिंतींवर वाल्मिकी रामायणावर आधारित भगवान श्रीरामांच्या जीवनातील सूक्ष्म दगडी कोरीव कामातून 87 प्रसंगांची मांडणी करण्यात आली आहे. तसेच भारतीय संस्कृतीतील कांस्य कास्ट केलेले 79 प्रसंग भिंतींवर कोरलेले आहेत. हे सर्व घटक येणाऱ्या अभ्यागतांना एकत्रितपणे एक अर्थपूर्ण आणि शैक्षणिक अनुभव प्रदान करतील तसेच भगवान श्रीरामांच्या आयुष्यातील आणि भारताच्या सांस्कृतिक परंपरेतील सखोल अंतर्दृष्टी प्रदान करतील.