अयोध्या : अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी विश्व हिंदू परिषदने देणगी म्हणून जमा केलेले 22 कोटी रुपये मूल्याचे सुमारे 15 हजार बँक चेक बाऊन्स झाले आहेत. मंदिर निर्माणासाठी केंद्राने स्थापन केलेल्या न्यास श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या एका ऑडिट रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, "खात्यामध्ये कमी रक्कम असल्याने किंवा काही तांत्रिक त्रुटींमुळे चेक बाऊन्स झाले आहेत." 


न्यासचे सदस्य डॉ. अनिल मिश्रा म्हणाले की, "तांत्रिक त्रुटी दुरुस्त करण्यासाठी बँक काम करत आहे. तसंच संबंधितांना पुन्हा एकदा दान करण्यास सांगत आहोत. या चेकपैकी जवळपास 2000 चेक अयोध्येतून जमा झाले होते."


यंदा मकरसंक्रांतीनंतर राम मंदिरासाठी विश्व हिंदू परिषदेने देशव्यापी धनसंग्रह अभियान सुरु केलं होतं. 15 जानेवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानाद्वारे राम मंदिराच्या निर्माणासाठी देशभरातून सुमारे पाच हजार कोटी रुपये जमा झाले होते. मात्र न्यासाने अद्याप एकूण रकमेची अंतिम आकडेवारी जाहीर केलेली नाही.


अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी एक हजार कोटी रुपये जमा करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र ट्रस्टच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार देणगी म्हणून जमा झालेली रक्कम तीन हजार कोटींपेक्षा जास्त आहे. एकूण देणगीची मोजलेली नाही. यासाठी 31 मार्चपर्यंत देणगी म्हणून मिळालेली रक्कम मोजली जाईल.