उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा आज अयोध्या दौऱ्यावर आहेत, तर उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांच्या उपस्थितीत उद्या धर्म संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दुसरीकडे, 16 जूनला उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अयोध्येत सध्या कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अयोध्येत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची कडक तपासणी केली जात आहे. हॉटेल, धर्मशाळांवरही पोलिसांची करडी नजर आहे.
5 जून 2005 रोजी अयोध्येतील वादग्रस्त परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता. या प्रकरणी आरोपींना 18 जून रोजी अलाहाबाद कोर्ट शिक्षा सुनावणार आहे. या कालावधीत तीन व्हीआयपी कार्यक्रम होणार असल्याने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री केशव मौर्या यांच्या उपस्थितीत उद्या होणाऱ्या धर्म संमेलनात साधूसंत राम मंदिरासह हिंदू धर्मावर आपले विचार प्रकट करतील.
उद्धव ठाकरे नवनिर्वाचित 18 खासदारांसह रविवारी 16 जून रोजी अयोध्येला जाऊन रामललांचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारला आपलं वचन न विसरता राम मंदिराच्या बांधणीला सुरुवात करण्याची आठवण करुन दिली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीपूर्वी खासदारांसह अयोध्येला जाण्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं होतं.