नवी दिल्ली :  अयोध्या प्रकरणी आज आठव्या दिवशीच्या सुनावणी दरम्यान रामललाचे वकील सीएस वैद्यनाथन यांनी आपली बाजू सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठासमोर मांडली. यावेळी वैद्यनाथन यांनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ अलाहाबाद हायकोर्टातील साक्षीदारांनी मांडलेले मुद्दे ठेवले. अलाहाबाद हायकोर्टातील साक्षीदारांच्या या वादग्रस्त जागेवर हिंदू लोकं  पूजा करायचे. या ठिकाणी तीर्थ यात्रेकरूंचं येणंजाणं सुरु होतं. मात्र कुठल्याही साक्षीदाराने या ठिकाणी नमाज होताना पाहिलं नाही, असे वैद्यनाथन म्हणाले.


सीएस वैद्यनाथन म्हणाले की, एक मुस्लिम साक्षीदार मोहम्मद यासीन यांनी या ठिकाणी नमाज पठण होत असल्याचा दावा केला आहे. मात्र त्यांनी देखील या ठिकाणी इमारतींमध्ये हिंदू धर्माच्या संबंधित प्रतीकं असल्याचे मान्य केलं आहे. वैद्यनाथन यांनी सांगितलं की, मुख्य मुस्लिम पक्षकारांपैकी एक असलेले मोहम्मद हाशिम यांनी देखील म्हटले आहे की, मक्केसाठी जे स्थान मुस्लिमांच्या मनात आहे तेच स्थान अयोध्येचं हिंदूंच्या मनात आहे.

वैद्यनाथन म्हणाले की, एका मुस्लिम साक्षीदाराने कोर्टात म्हटलं होतं 'जर असं सिद्ध झालं की बाबरी मशीद मंदिराला पाडून बनवली गेली तर आम्ही त्याला मशीद मानणार नाही. यापेक्षा ही जागा हिंदूंच्या स्वाधीन करायला हवी'.

वैद्यनाथन यांनी सर्वात आधी 12 व्या शतकातील एका शिलालेखाचे छायाचित्र कोर्टासमक्ष प्रस्तुत केले. त्यांनी सांगितले की, या शिलालेखामध्ये साकेत मंडळाचा राजा गोविंद चंद्र यांचा उल्लेख आहे. यामध्ये संस्कृत भाषेत लिहिलं आहे की, त्यांनी भव्य विष्णू मंदिर बनवले होते. पुरातत्व विभागाने या शिलालेखाला दुजोरा दिला आहे.

वैद्यनाथन पुढे म्हणाले की, वादग्रस्त भाग पाडताना तिथं उपस्थित एका पत्रकाराने साक्ष देताना सांगितलं आहे की, त्याने दक्षिणी गुंबद पडताना पाहिला. या शिलालेखासोबत वादग्रस्त पाडलेल्या भागाच्या मलब्यातून अनेक प्रतीकं मिळाली आहेत, जी हिंदू धर्माशी संबंधित आहेत.  ASI च्या खोदकामात जे विशालकाय मंदिर मिळाले होते ते मंदिर राजा गोविंद चंद्र यांनी बांधलेलं विष्णू मंदिर होतं, असंही त्यांनी सांगितलं.
Ram Mandir Case : आठवड्यातील पाच दिवस सुनावणी न घेण्याची मुस्लीम पक्षकारांची मागणी सुप्रीम कोर्टाने फेटाळली

सातव्या दिवशी झालेल्या सुनावणीत वैद्यनाथन यांनी नकाशे, छायाचित्र आणि पुरातन काळातील पुरावे देत दोन हजार वर्षांपूर्वी या वादग्रस्त ठिकाणी भव्य राम मंदिर होते असा दावा केलाहोता.  मंदिराच्या वरील भागावर वादग्रस्त इमारत तयार केली गेली. प्राचीन मंदिरांचे खांब आणि अन्य सामग्रीचा उपयोग या इमारतीच्या निर्मिती प्रक्रियेत केला आहे. अशा प्रकारची इमारत ही शरियतनुसार मशीद होऊच शकत नाही, असे रामललाचे वकील सी एस वैद्यनाथन यांनी म्हटले होते. 1950 साली फैजाबादचे कोर्ट कमिश्नर यांनी तयार केलेला नकाशा दाखवत वकील सी एस वैद्यनाथन यांनी आपली बाजू मांडली होती. या नकाशामध्ये स्पष्ट दिसत आहे की, वादग्रस्त भागामध्ये हिंदू विधीनुसार पूजा करत आहेत, असे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांनी या भागाची 1990 मध्ये घेतलेली छायाचित्रं कोर्टाच्या समक्ष ठेवली. हा भाग ज्या खांबांवर बनवला गेला होता, त्यावर तांडवमुद्रेत शिव, हनुमान आणि कमळासोबत सिंहाच्या मध्ये बसलेली गरुडाची प्रतिमा असल्याचे त्यांनी कोर्टाला दाखवले.  वैद्यनाथन म्हणाले की, अशा प्रकारच्या प्रतिमा इस्लामिक नाहीत. अशी प्रतीकं असणाऱ्या इमारतींना मशीद म्हणत नाहीत, असेही त्यांनी म्हटले होते.
अयोध्या प्रकरण सुनावणी | अयोध्या श्रीराम जन्मभूमी असल्याचा हिंदूंना विश्वास : रामलल्लाचे वकील