नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणाची मंगळवारी म्हणजे 29 जानेवारीला होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाने पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली होती. मात्र या पाच न्यायमूर्तींपैकी एक न्यायमूर्ती मंगळवारी अनुपस्थित राहणार असल्याने ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.


न्यायमूर्ती एस. ए. बोबडे हे 29 जानेवारीला अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे 29 जानेवारीची सुनावणी रद्द करण्यात आली असून लवकरच पुढीत तारीख निश्चित केली जाईल.


आधीच्या घटनापीठातील न्यायमूर्ती यू यू ललित यांनी अयोध्या राम मंदिर प्रकरणी वकील म्हणून कामकाज पाहिलं होतं. त्यामुळे ते घटनापीठात कसे असू शकतात, असा सवाल मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांनी उपस्थित केला होता. यानंतर न्यायमूर्ती ललित यांनी स्वत: घटनापीठातून वेगळ होण्याच निर्णय घेतला होता.


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी नव्या घटनापीठाची स्थापना केली होती. नव्या घटनापीठात न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांना समावेश करण्यात आला होता. न्या. अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांनी याआधी माजी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासोबत अयोध्या प्रकरणाची सुनावणी केली आहे. नव्या घटनापीठात सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस ए बोबडे, न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड, न्यायमूर्ती, अशोक भूषण आणि अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.