नवी दिल्ली : अयोध्येतील प्रकरणाकडे आस्थेच्या नव्हे, तर जमिनीच्या वादासारखेच बघितले जाईल, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले. आज झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने नमूद केले. अयोध्येतील राममंदिर प्रकरणी पुढील सुनावणी 14 मार्चला होणार आहे.

खटल्याशी संबंधित काही पुस्तकांचे वाचन बाकी आहे. त्या पुस्तकांचे इंग्रजी अनुवाद सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणात एकूण 42 पुस्तके न्यायालयासमोर सादर करण्यात आली. या सर्व पुस्तकांचे अनुवाद 2 आठवड्यात सादर करुन, सर्व पक्षकारांना ते दिले जावेत, असंही कोर्टानं सांगितलं आहे.

सर्व पक्षकारांनी या खटल्याकडे जमिनीच्या खटल्याप्रमाणे पाहावं, असंही न्यायालयाने नमूद केलं आहे. आजच्या सुनावणी दरम्यान एजाज मकबुल यांनी अद्यापही अनेक कागदपत्र आम्हाला मिळाले नसल्याचं मुस्लिम पक्षाच्या वतीने सांगितलं.

आज कोर्ट शांत!

5 डिसेंबरला झालेल्या सुनावणीवेळी मुस्लिम पक्षकारांनी सुनावणी टाळण्याची मागणी करत, भांडणाच्या आवाजात युक्तीवाद केला होता. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील कपिल सिब्बल यांनी लोकसभा निवडणुकीनंतर 2019 साली सुनावणीची मागणी केली होती. त्यावेळी राजकीय वाद झाल्याने आज कपिल सिब्बल कोर्टात गैरहजर राहिले. त्यामुळे सुन्नी वक्फ बोर्डाची बाजू एजाज मकबूल यांनी मांडली.