मुंबई: मोबाईल कंपन्यांप्रमाणे बँकिंग क्षेत्रातही मोठी स्पर्धा सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यातल्या त्यात गृहकर्जाबाबतीत तर या स्पर्धेने टोक गाठलं आहे.


खासगी क्षेत्रातील आघाडीच्या अॅक्सिस बँकेने गृहकर्जदारांना तब्बल 12 मासिक हप्ते माफ करण्याची घोषणा केली आहे. मात्र त्यासाठी तुमचं गृहकर्ज 30 लाखांवर असायला हवं, शिवाय त्याचा एकही हप्ता तुमच्याकडून थकायला नको, अशी अट आहे.

अॅक्सिस बँकेने शुभारंभ ही नवी योजना आणली आहे. त्याअंतर्गत ही ऑफर देण्यात आली आहे.

मात्र सलग वर्षभराचे हप्ते माफ होणार नाहीत, तर कर्जदाराने नियमित कर्ज भरलं, तर त्याला चौथ्या, आठव्या आणि बाराव्या वर्षी असे चार-चार महिने सूट दिली जाईल.

हे कर्ज घर खरेदी, दुरुस्ती, बांधकाम किंवा जमीन घेऊन बांधकामासाठीच वापरता येऊ शकतं. या गृहकर्जाचा व्याजदर 8.35 % असेल.

जर तुमचं दुसऱ्या बँकेत गृहकर्ज असेल, तर ते अॅक्सिस बँकेत वर्ग करण्याची ऑफरही देण्यात आली आहे.

व्याजदराचं गणित

  • तुम्ही 30 लाख रुपयांचं गृहकर्ज 20 वर्षांसाठी 8.35 टक्के व्याजदराने घेतलं, तर त्याचा मासिक हप्ता (ईएमआय) 25 हजार 751 रुपये असेल. 20 वर्षांसाठी तुम्हाला व्याजासह एकूण 61 लाख 80 हजार 141 भरावे लागतील.

  • मात्र शुभारंभ योजनेनुसार तुम्हाला 12 हप्त्यांचे 3 लाख 9 हजार 12 रुपये माफ होतील.

  • या योजनेनंतर तुम्हाला व्याजासह एकूण 61 लाख 80 हजार 141 ऐवजी 58 लाख 71 हजार 129 रुपये परतफेड करावे लागतील.