याबाबत तथागत रॉय यांनी एक ट्वीट केलं आहे. 'कधी दही हंडी, आज फटाके उद्या असं होईल की, प्रदूषण होतं म्हणून मेणबत्ती आणि पुरस्कार वापसी गँग हिंदूंच्या चिता दहनाविरोधातही याचिका दाखल करतील.'
एकीकडे आधीच याबाबत वाद-विवाद सुरु असताना खुद्द राज्यपालांनी अशा पद्धतीचं ट्वीट केल्यानं आता याविषयी आणखी चर्चा सुरु झाली आहे.
दरम्यान, याआधी काही जणांनी देखील या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली होती.
याआधी चेतन भगत याने देखील या निर्णयाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. 'फक्त हिंदू सणांबाबतच असे नियम का? बकऱ्याचा बळी, मोहरमच्या पालख्यांवर बंदी लावण्यात येईल? फटाक्यांशिवाय दिवाळी म्हणजे जसं की, ख्रिसमस ट्री शिवाय ख्रिसमस आणि बकऱ्याच्या बळीशिवाय बकरी ईद.'
सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?
राजधानी दिल्लीत यावर्षी विनाफटाक्यांची दिवाळी साजरी होणार आहे. फटाके विक्रीवर गेल्या वर्षी घालण्यात आलेली बंद सुप्रीम कोर्टाने यावर्षीही कायम ठेवली आहे. पोलिसांनी दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात आले आहेत.
यावर्षी 12 सप्टेंबर रोजी देण्यात आलेला आदेश 1 नोव्हेंबारपासून लागू होणार आहे. या आदेशामध्ये दिल्ली एनसीआरमध्ये काही अटींसह फटाके विक्रीला परवानगी देण्यात आली होती. मात्र आता या नव्या आदेशामुळे विक्रेत्यांना 1 नोव्हेंबरपर्यंत फटाक्यांची विक्री करता येणार नाही.
यावर्षी फटाक्यांवर बंदी घातल्यानंतर प्रदूषण कमी होतं का, हे पाहणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. वाढतं प्रदूषण पाहता गेल्या वर्षी सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर बंदी घातली होती.