नवी दिल्ली : भारताच्या 70 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व सरकारी कार्यालयांना प्लॅस्टिक झेंडे न वापरण्याची सूचना केली आहे. भारतीय ध्वजसंहिता 2002 आणि राष्ट्रीय प्रतिकांच्या अवमान प्रतिबंधक कायद्यानुसार ही सूचना करण्यात आली आहे. गृह मंत्रालयाने सर्व माध्यमांना याबद्दल जनजागृती करण्याचे आवाहनही केले आहे.


 

स्वातंत्र्यदिन हा भारताचा राष्ट्रीय सण असून या दिवशी तिरंगा फेकणे किंवा त्याची हेळसांड करणे कायद्याने गुन्हा आहे. तिरंग्याचा सन्मान केला पाहिजे तसेच आपत्कालीन परिस्थितीत सन्मानपूर्वक विल्हेवाट लावली पाहिजे. त्यामुळे प्लॅस्टिकपासून बनलेले झेंडे न वापरण्याबद्दल  माध्यमांनी जनजागृती करावी असंही आवाहन गृह मंत्रालयाने केलं आहे.

 

दरवर्षी लाखो प्लस्टिकचे झेंडे रस्त्यावर टाकले जातात. यामुळे राष्ट्रीय बोधचिन्हाचा अवमान होतो. यावर उपाय म्हणून गृह मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.