श्रीनगर : उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात हिमस्खलनाखाली गाडी अडकली. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. यातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गाडीत एकूण सात जण होते.

कुपवाडा-तंगधार मार्गावर साधन टॉपजवळ मोठं हिमस्खलन झालं. यामध्ये एक प्रवाशी वाहन अडकलं.

जम्मू-काश्मीरच्या कारगिल, लेह आणि श्रीनगरमध्ये मोठी बर्फवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी आहे. या संपूर्ण परिसरात थंडीमुळे लोकांची स्थिती फार बिकट झाली आहे. कारगिलमधील तापमान वजा 20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले असून, हे तापमान आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

उत्तराखंडमध्येही मोठी थंडी आहे. दिवसागणिक कमी होत जाणाऱ्या तापमानामुळे पाण्याच्या पाईपपासून नदी आणि झरेसुद्धा गोठू लागले आहेत. बर्फाची मजा घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसुद्धा त्रास होत आहे.

हिमाचल प्रदेशमधील स्थितीही काही वेगळी नाही. बर्फवृष्टीनंतर थंडी आणखीच तिथेही वाढली आहे. शिमल्यासह संपूर्ण हिमाचल प्रदेशात थंडीमुळे लोकांचे मोठे हाल होत आहेत. लाहौलमध्ये तापमान वजा 7 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेला आहे.