जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, आयईडी स्फोटात चार पोलीस शहीद
एबीपी माझा वेब टीम | 06 Jan 2018 12:20 PM (IST)
जम्मू-काश्मीरममधील सोपोर शहरात दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात चार पोलीस शहीद झाले आहेत.
जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या सोपोर शहरात दहशतवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून आणला आहे. ज्यामध्ये तब्बल चार पोलीस शहीद झाले आहेत. तसचे अनेक पोलीस जखमी झाले आहेत. स्फोटानंतर या संपूर्ण परिसराला पोलिसांनी घेराव घातला आहे. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये छोटा बाजार आणि मोठा बाजारमधील एका गल्लीतील दुकानात आयईडी स्फोट करण्यात आला. फुटीरतावादी येथे आंदोलनाच्या तयारीत असल्यानं पोलीस या ठिकाणी गस्त घालत होते. त्याचवेळी हा स्फोट झाला. अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्यानं दिली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच पोलिसांनीकडून हल्लेखोर दहशतवाद्यांचा शोधही सुरु आहे. फुटीरतावाद्यांच्या विरोध प्रदर्शनामुळे इथं आधीच सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. पण याच ठिकाणी स्फोट झाल्यानं आता इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.