पणजी : वास्को शहरातून सहा वर्षीय बालिकेच्या अपहरणाचा प्रयत्न केला गेला. वास्को शहरातील जोशी चौकातील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमबाहेर हा प्रकार घडला. वास्को पोलिसांनी या प्रकरणी एका परप्रांतीय व्यक्तीविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे. उत्तमपुमार बिंद (45) असे या संशयिताचे नाव असून तो मुळचा उत्तर प्रदेश येथील असून सध्या तो गांधीनगर-वास्को येथील राहणारा आहे.


वास्को शहरातील सड्यावरील नागझरकर हे बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये गेले होते. यावेळी त्यांची सहा वर्षीय मुलगी एटीएमबाहेर उभी होती. नागझरकर बाहेर आल्यावर मुलीचा हात पकडून चालू लागले. त्याच वेळी असलेल्या अज्ञात परप्रांतीय व्यक्तीने नागझरकर यांच्या मुलीला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलीला कोणीतरी पळवून नेत असल्याच्या संशयावरुन त्यांनी आरडाओरड केली.

वर्दळीच्या फुटपाथवरच हा प्रकार घडल्याने मुलीच्या वडिलांसह इतर लोकांनी त्या व्यक्तीत्या तावडीतून मुलीची सुटका केली. परंतु ही परप्रांतीय व्यक्ती मुलीचे अपहरण करू पाहात असल्याच्या संशयाने जमलेल्या लोकांनी त्याला बेदम झोडपले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले.

मुलीच्या वडिलांनी अपहरणाचा प्रयत्न झाल्याची तक्रार वास्को पोलीस स्थानकात दिल्याने पोलिसांनी या प्रकरणी संशयीत व्यक्तीविरूध्द अपहरणाचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्याची नोंद केली आहे.