हैदराबाद : गोळी चालवायची असेल तर माझ्यावर चालवा, दलितांवर नको, असं भावनिक आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. दलितांना त्रास देण्याचा कुणालाही अधिकार नसल्याचं मोदींनी बजावलं आहे.


 
दलितांवर हल्ला न करण्याचं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. रविवारी हैदराबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काल गो-रक्षेच्या मुद्यावरुन मोदींनी खडसावलं असतानाच आज दलितांवर होणाऱ्या अत्याचारावर मोदींनी जोरदार टीका केली आहे.

 
बनावट गोरक्षकांपासून सावध राहण्याचा इशारा मोदींनी दिला. हे ढोंगी आणि बनावट गोरक्षक समाज आणि देशात दुफळी माजवू पाहत आहेत. अशा व्यक्तींना दंड ठोठावण्याचा सल्ला पंतप्रधानांनी संबंधित राज्यांना दिला आहे. पशुधन ही देशाची संपत्ती असून गोरक्षणाच्या नावाखाली समाजात तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचंही ते म्हणाले.

 
11 जुलै रोजी गुजरातमधील उनामध्ये गाईचं मांस बाळगल्याच्या संशयावरुन दलित तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर काल पहिल्यांदाच मोदींनी मौन सोडलं.