गांधीनगर : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी विजय रुपानी यांनी आज शपथ घेतली, नितीन पटेल यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. दिग्गज भाजप नेत्यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला.
गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार झालेल्या आनंदीबेन पटेल यांच्या नजीकच्या मानल्या जाणाऱ्या नऊ मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला, तर पाटीदार समाजातील नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे.
राज्यपाल ओ पी कोहली यांनी 60 वर्षीय रुपानींना पदाची शपथ दिली. रुपानींव्यतिरिक्त उपमुख्यमंत्री नितीन पटेल आणि सात अन्य कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. एकूण 16 मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. गुजरातच्या मंत्रिमंडळात सध्या 25 मंत्र्यांचा समावेश आहे.
भाजप अध्यक्ष अमित शाह, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय मंत्री अरुण जेटली, डॉ. हर्ष वर्धन यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, झारखंडचे मुख्यमंत्री रघुबर दास, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टरही उपस्थित होते.