दिल्ली : देशभरात आज म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी सर्व एटीएम बंद राहणार आहेत. तर 10 तारखेलाही काही ठिकाणी एटीएम बंद राहतील. याशिवाय सर्वसामान्य नागरिकांसाठी बँकांचे व्यवहार बंद असणार आहे. एक हजार आणि पाचशेच्या नोटा रद्द झाल्या आहेत, मात्र 100 रुपये, 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये, 5 रुपये, 2 रुपये आणि 1 रुपयाची नोट तसंच दहा, पाच, दोन आणि एक रुपयाची नाणी चलनात असतील.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आजपासून पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्दबातल करण्यात आल्याचं स्पष्ट केलं. 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून या नोटा रद्द होतील. तसंच जमा केलेल्या नोटांच्या बदल्यात दिवसाला 4000 रुपये काढता येणार आहेत.

कुठे जमा करता येतील या नोटा?

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बँक किंवा पोस्ट ऑफिसात जमा करता येतील. 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या 50 दिवसांच्या कालावधीत नागरिकांना त्यांच्याकडे असलेल्या नोटा बदलून घेता येतील. मात्र 9 नोव्हेंबरपासून पाचशे-हजारच्या नोटा कायदेशीररित्या रद्दबातल असून त्यांचं महत्त्व कागदाच्या एका तुकड्याइतकं असेल, असं मोदी म्हणाले. मोदी सरकारने घेतलेला हा आजवरचा ऐतिहासिक निर्णय मानला जात आहे.

चिंतेचं कारण नाही :

पैसे जमा करताना घाई-गडबड करु नका, तुमचे पैसे तुमचेच आहेत, असा दिलासा पंतप्रधानांनी दिला. सध्या चार हजार रुपयांपर्यंतची रक्कम (पाचशे आणि हजारच्या नोटा) बदलून घेता येतील. पॅनकार्ड, आधारकार्ड यासारखी ओळखपत्र दाखवून नोटा बदलून मिळतील. 10 नोव्हेंबरपासून ही मर्यादा वाढवण्यात येईल.

ज्यांना 30 डिसेंबरपर्यंत काही कारणाने सर्व नोटा बदलून घेता येणार नाहीत, त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करुन 31 मार्च 2017 पर्यंत नोटा बदलून घेता येतील.

रुग्णांची असुविधा टाळण्यासाठी पुढील 72 तास म्हणजे 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर औषध खरेदीसाठी पाचशे आणि हजाराच्या नोटा स्वीकारल्या जातील. परदेशात प्रवास करत असलेल्या व्यक्तींना, काही महत्त्वाच्या ठिकाणी (रुग्णालयं, पेट्रोल पंप, सीएनजी पंप, रेल्वे आणि बस तिकीट काऊंटर, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विमानतळं, स्मशान इत्यादी) 11 तारखेपर्यंत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांनी व्यवहार करण्याची मुदत देण्यात आली आहे.

दोन हजार रुपयांची नोट :

दोन हजार रुपयांची नोट चलनात आणण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बँकेने स्वीकारल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली आहे.