जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमधील एटीएम फोडण्याचा डाव, मुंबईतल्या अलार्ममुळे उधळला आहे. जयपूरच्या झोटवाडा भागातील हा प्रकार असून, पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत.

झोटावाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही अज्ञात झोटावाडाच्या बोरिंग चौकातील आयसीआयसीआय बँकेचे एटीएम लुटण्याच्या प्रयत्नात होते. यासाठी चोरट्यांनी सुरुवातीला एटीएम सेंटरमधील कॅमेऱ्याची मोडतोड केली. त्यानंतर त्यांनी एटीएमचा खालचा भाग तोडण्यास सुरुवात केली.

पण पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच चोरट्यांनी पोबारा केला. या एटीएममध्ये तब्बल आठ ते दहा लाखापर्यंतची रोकड असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एटीएम तोडण्याचा प्रयत्न सुरु असताना, मशिनमधील सेक्यूरिटी सिस्टीमचा अलार्म मुंबईतल्या कंट्रोल रुममध्ये वाजला. यानंतर बँकेने याची सूचना तात्काळ स्थानिक पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत एटीएम फोडण्याचा डाव उधळला.

दरम्यान, सेक्युरिटी सिस्टीममुळे चोरटयांचा एटीएम फोडण्याचा प्रकार सुरु असताना एटीएमचा सेक्युरीटी रक्षक जागी नव्हता.