बनावट कार्ड वापरुन ATM वर डल्ला, इंजिनिअरिंगचे 2 विद्यार्थी अटकेत
एबीपी माझा वेब टीम | 27 May 2016 04:06 AM (IST)
बेळगाव: बनावट एटीएम कार्ड वापरून युनियन बँकेच्या एटीएममधून पैसे काढणाऱ्या दोघांना शहापूर पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. अक्षय रेवणकर(२३)रा शिवाजी नगर सांगली आणि आकाश दत्तात्रय घोरपडे(२३) रा म्हैशाळ, सांगली अशी त्यांची नावे आहेत. हे दोघेही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. अक्षय आणि आकाश हे दोघेजण २३ मे रोजी बेळगावला आले आणि त्यांनी ठळकवाडीतील एका लॉजमध्ये खोली घेतली. नंतर वडगावमधील एका बँकेच्या एटीएममध्ये सुरक्षा रक्षक नसताना एटीएम कार्ड काढण्यासाठी ग्राहक घालतात तेथे कॅमेरा आणि एक इलेक्ट्रोनिक पट्टी बसवली. या कॅमेरा आणि पट्टीमध्ये पैसे काढणाऱ्या ग्राहकांचे पिन नंबर आणि इतर तपशील रेकॉर्ड केले. नंतर आपलेच तयार केलेले ड्युप्लिकेट कार्ड वापरून दोन हजार रु काढण्यात ते यशस्वी झाले. दरम्यान सीसीटीव्ही फुटेज नेहमी प्रमाणे पाहताना सुरक्षा रक्षकाला दोन व्यक्तींनी एटीएम मशिनला काहीतरी बसविल्याचे ध्यानात आले. सुरक्षा रक्षकाने ही माहिती बँकेच्या अधिकाऱ्यांना दिल्यावर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी एटीएमवर पाळत ठेवली आणि ते दोघेजण पुन्हा पैसे काढण्यासाठी आल्यावर त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या लॉजमधील खोलीची झडती घेतल्यावर एटीएम कार्ड तयार करण्यासाठी लागणारे साहित्य,वॉकी टाकी आणि इतर इलेक्ट्रोनिक वस्तू जप्त केल्या. त्यांना पोलिस स्टेशनमध्ये आणल्यावर त्यांनी आपण ड्युप्लिकेट कार्ड तयार करून रेकॉर्ड केलेला पिन क्रमांक वापरून पैसे काढत असल्याची कबुली दिली. सुरक्षा रक्षक आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांना पहिल्यांदाच पैसे काढताना अटक झाली अन्यथा त्यांनी चांगलाच डल्ला मारला असता. शहापूर पोलिस निरीक्षक लक्कणवर आणि त्यांच्या स्टाफने ही कारवाई केली.