Ashraf Ahmed Shot Dead: गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि अशरफ अहमद (Ashraf Ahmed) यांची पोलीस बंदोबस्तात असतानाही खुलेआम हत्या करण्यात आली आहे. पोलीस या दोन्ही गँगस्टर भावांना वैद्यकीय चाचणीसाठी घेऊन जात होते. वाटेत माध्यमांशा हे दोन्ही गुन्हेगार बोलत असताना अचानक एकाने अतिकच्या थेट डोक्यात गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अशरफवर तिघांनी पिस्तुलीतून बेछूट गोळीबार केला. यात अतिक आणि अशरफ दोघेही ठार झाले. ही सर्व घटना उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये घडली. यानंतर तिन्ही आरोपींना स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केलं. या तिन्ही आरोपींनी अतिक, अशरफ यांची हत्या का केली, यामागे त्यांचा काय हेतू होता, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
एखाद्या चित्रपटात शोभेल असं हत्येचं आणि त्यानंतरच्या गोळीबाराचं भयानक दृष्य कॅमेराबंद झालं आहे. अतिक आणि अशरफ यांना जेरबंद करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी जंगजंग पछाडलं होतं. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी अतिक अहमदचा मुलगा असद एन्काऊंटरमध्ये मारला गेला होता.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची शनिवारी रात्री दहा वाजता पोलिस बंदोबस्तात हत्या करण्यात आली. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराज येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले. हल्लेखोरांनी गोळीबार केला तेव्हा प्रसारमाध्यमांनी दोघांची चौकशी केली. हल्लेखोरांनी अतिक अहमद यांच्या डोक्यात गोळी झाडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोर मीडियावाले म्हणून आले होते.
जेव्हा अतीक अहमदला विचारण्यात आलं की, तो मुलगा असदच्या अंत्यसंस्काराला जाऊ शकला नाही, तेव्हा तो म्हणाला की, "घेऊन नाही गेले, तर नाही गेलो." त्यानंतर हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळी झाडली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.
मुलाच्या अंत्यसंस्काराला गेला नाही अतिक अहमद
अतिक अहमदचा मुलगा असद अहमद आणि त्याचा मित्र गुलाम या दोघांना गुरुवारी (13 एप्रिल) यूपी एसटीएफनं चकमकीत ठार केलं. यानंतर कडेकोट बंदोबस्तात प्रयागराज येथील कासारी मसारी स्मशानभूमीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलाच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी अतिक अहमद यानं अर्ज केला होता, मात्र त्यावर सुनावणी होऊ शकली नाही.
कासारी मासारी स्मशानभूमीत मृतदेह दफन करण्याच्या प्रक्रियेला सुमारे एक तास लागला. यावेळी अतिक अहमद आणि त्यांच्या कुटुंबातील कोणीही जवळचा सदस्य उपस्थित नव्हता.
उत्तर प्रदेशात कलम 144 लागू
अतिक अहमदच्या हत्येनंतर तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण उत्तर प्रदेशात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये तातडीची बैठक घेतली. ही उच्चस्तरीय बैठक सुमारे तीन तास चालली. मुख्यमंत्र्यांनी लोकांना शांतता राखण्याचं आणि अफवांवर लक्ष न देण्याचं आवाहन केलं आहे. अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असंही ते म्हणाले.