Atal Bihari Vajpayee Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांची आज पाचवी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने भाजपने एका कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून अटल बिहारी वाजपेयी यांचं स्मरण केलं जाईल. कार्यक्रमाच्या दरम्यान भाजपचे सर्व मोठे नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे पुण्यतिथीच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच एनडीएतील (NDA) घटक पक्षांना भाजपने आमंत्रित केले आहे. वाजपेयींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लासह भाजपच्या सर्व मोठया नेत्यांची उपस्थिती आहे. 


यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल समाधीवर पोहोचून माजी पंतप्रधानांना पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूही दिसल्या, त्यांनीही यावेळी वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. 


एनडीएच्या सर्व नेत्यांची उपस्थिती 


भाजपकडून निमंत्रण मिळाल्यानंतर एनडीएचे सर्व मोठे नेतेही या पुण्यतिथी कार्यक्रमाला पोहोचले आहेत. एनडीएचे घटक पक्ष नेते जीतन राम मांझी, सुदेश महतो, थंबी दुराई, शिवसेनेचे राहुल शेवाळे, प्रफुल्ल पटेल, अगाथा संगमा, अनुप्रिया पटेल हेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यांच्याशिवाय एनडीएचे आणखी काही नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते. 






माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधी स्थळावर सदैव अटल येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अटलबिहारी वाजपेयी यांची मुलगी नमिता भट्टाचार्य आणि जावई रंजन भट्टाचार्यही कार्यक्रमाला पोहोचले. पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूरही पोहोचले.


बिहारचे मुख्यमंत्री आणि माजी NDA सहयोगी नितीश कुमार देखील अटल बिहारी वाजपेयी यांच्या समाधीला भेट देण्यासाठी दिल्लीला पोहोचले आहेत, जिथे ते त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली अर्पण करतील. 


भारताचे दहावे पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे 16 ऑगस्ट 2018 रोजी निधन झाले होते. लोकनेते असा नावलौकिक असलेले अटल बिहारी वाजपेयी हे राजकीय वचनबद्ध्तेसाठी ओळखले जातात. वाजपेयी नऊ वेळा लोकसभेवर तर दोनवेळा राज्यसभेवर निवडून आले होते हाही एक प्रकारचा विक्रमच आहे. ब्रिटीश सत्तेला भारतातून पायउतार करण्यात महत्वाच्या ठरलेल्या 1942 मधील भारत छोडो चळवळीमध्ये सहभागी होऊन विद्यार्थीदशेतच वाजपेयी यांनी राष्ट्रवादी राजकारणाचे धडे गिरवले. 


महत्त्वाच्या बातम्या : 


NMML Is Now PMML : नेहरु मेमोरियल म्युझियमचे नाव बदललं, आता पीएम म्युझियम म्हणून ओळखलं जाणार; का बदललं नाव?