वनवास संपला आता राम मंदिराची अपेक्षा : संजय राऊत
एबीपी माझा वेब टीम | 11 Mar 2017 02:11 PM (IST)
मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर प्रदेशातील विजयाबाबत भाजपचं अभिनंदन करत आता लवकरच राम मंदिर बनवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. राम का वनवास अब खत्म हुआ है, हम अभी राम मंदिर की अपेक्षा करते हैं, असं राऊत म्हणाले. मोदींचं, भाजपचं अभिनंदन पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल हे लोकशाहीच्या प्रक्रियेतून आले आहेत. भाजपला मिळालेल्या यशाचं आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आम्ही अभिनंदन करतो, असं संजय राऊत म्हणाले. लोकांना जिथे पर्याय दिसला तिथे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केलं. उत्तर प्रदेशातील राजकारण बदलत आहे. विजय हा विजय असतो, असंही संजय राऊत यांनी सांगितलं. शिवसेनेने मुंबईत मोदी लाट थांबवली शिवसेनेचं महत्त्व आज लक्षात येईल. आम्ही मुंबईत मोदी लाट कशी थांबवली, हे लक्षात आलं असेल. महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचा काही परिणाम होणार नाही, असा दावाही संजय राऊत यांनी केला. तसंच महाराष्ट्राच्या विषयावर आपण आठ दिवसानंतर बोलू. त्यानंतर काही उसळलेल्या लाटा थांबतील, अनेक सत्ता स्थापन केल्या जातील, असं संजय राऊत म्हणाले.