Flood in Assam : आसामच्या पूर्वेकडील भागात सततच्या वापसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्तळीत झालं आहे. आसाम (Assam), सिक्कीमसह (Sikkim) अनेक राज्यांमध्ये जागोजागी पाणी भरलं आहे. काही ठिकाणी भूस्खलन (Landslide) झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. आसाममधील बहुतेक नद्यांच्या पाण्याच्या पातळी प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठचे अनेक परिसर जलमग्न झाले आहेत.


यापुरामध्ये आसामचे परिवहन मंत्री एका रुग्णाच्या मदतीला धावून आल्याचं पाहायला मिळालं. आसामचे परिवहन मंत्री परिमल शुक्लावैद्य हे पूरपरिस्थिती जनतेची मदत करताना दिसत आहेत. नुकताच त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी रुग्णाची मदत केल्याचं दिसत आहे. परिमल शुक्लावैद्य यांनी रुग्णाला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी बोट चालवल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. 







परिवहनमंत्र्यांनी चालवली बोट
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाला डायलिसिससाठी रुग्णालयात जायचे होते. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यात अडचण येत होती. यावेळी परिवहन मंत्री परिमल रुग्णाच्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी स्वत: बोटी चालवत रुग्णाची मदत केली. बराक खोऱ्यात पूर भागातून हातानं चप्पू चालवत रुग्णाला रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत केली.


आसाममधील 32 जिल्हे पाण्याखाली गेले
ब्रह्मपुत्रा आणि बराक नद्यांना पूर आल्यामुळे आसाममधील बहुतांश जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांपैकी 32 जिल्ह्यांमध्ये पूर आला असून परिसर जलमग्न झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक नदी आणि त्यांच्या उपनद्या ओसंडून वाहत असल्याने जमिनीचा मोठा भाग पाण्याखाली गेला आहे.


पुराचा परिणाम पाहता अनेक सखल भागात गुडघाभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर लष्कर आणि एनडीआरएफच्या टीमच्या मदतीने अनेक भागातून हजारो लोकांची सुटका करण्यात येत आहे. परिवहन मंत्री परिमल शुक्लावैद्य आसाममधील कचार जिल्ह्यातील सिलचर येथे तळ ठोकून आहेत आणि स्थानिक आमदार, उपायुक्त आणि तीन जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह बराक खोऱ्यातील पूर परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या