Assam Flood : आसाममध्ये पूरस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यामुळं तेथील जनजीवन विस्कळीत झालं आहे. लाखो लोक बेघर झाल्यानं स्थिती चिंताजनक झाली आहे. दरम्यान, यामुळं गुरुवारी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत पुराच्या पाण्यामुळं एकूण 108 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी या पूरस्थितीचं हवाई पाहणी केली. त्यानंतर त्यांनी जनतेला मदतीचं आस्वासन दिलं आहे. तसेच पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितलं.
पूर बाधितांची संख्येत घट
कचार जिल्ह्यातील सिलचर येथे मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. एनडीआरएफ, एसडीआरएफ, लष्कर, इतर एजन्सी बचाव कार्य करत आहेत. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बुलेटिननुसार पुरामुळे बाधित लोकांची संख्या कमी झाली आहे. 30 जिल्ह्यांतील 45.34 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. तर बुधवारी 32 जिल्ह्यांतील पूरग्रस्तांची संख्या 54.5 लाख होती. त्यामुळं परबाधितांच्या संख्येत घट झाली. हळूहळू काही ठिकाणी पुराचं पाणी उतरत असल्याची स्थिती दिसत आहे. केंद्र सरकारचे सहकार्य करण्याचं आवाहन
केंद्राची सर्वतोपरी मदत
आसाममधील पूर परिस्थितीवर केंद्र सरकार सातत्यानं लक्ष ठेवून आहे. आव्हानाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य सरकारसोबत काम करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. लष्कर आणि एनडीआरएफचे पथक पूरग्रस्त भागात उपस्थित आहेत. त्याच्या माध्यमातून बचाव कार्य सुरु आहे. बाधित लोकांना मदत करत आहेत. दरम्यान, पुरामुळे आतापर्यंत 108 जणांचा मृत्यू झाला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्या आणि त्यांच्या उपनद्यांना मोठा पूर आला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणचा संपर्क तुटला आहे. मात्र, काही ठिकाणी आता पुराचे पाणी ओसरले आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या बरपेटा येथील परिस्थिती सर्वात वाईट आहे. तिथे 10 लाख 32 हजार 561 लोक पुरामुळे प्रभावित झाले आहेत. तर कामरुपमध्ये 4 लाख 29 हजार 166, नागावमध्ये 4 लाख 29 हजार 166, धुबरीमध्ये 3 लाख 99 हजार 945 लोक बाधित झाले आहेत.