Assam CM on Rahul Gandhi : उत्तराखंडमध्ये भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेले आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा  (Himanta Biswa Sarma) यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्या वक्तव्यावरुन सध्या देशात वादंग निर्माण झाले आहे. काँग्रेसकडून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या टिकेच्या निषेधार्थ एनएसयूआय ( NSUI ) आज आसाम भवनासोर आंदोलन करणार आहे. या आंदोलनात काँग्रेसला समाजवादी पक्षाचाही पाठिंबा मिळाला आहे.


उत्तराखंडमध्ये 14 फेब्रुवारीला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपा उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या आसामच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. यावेळी मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी काँग्रेसवर अनेक प्रश्न उपस्थित केले. राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितल्याच्या वक्तव्यावरही मुख्यमंत्री शर्मा यांनी टीका केली. त्यांची मानसिकता पाहा, देशाचा अभिमान, जनरल बिपिन रावत यांच्या नेतृत्वाखाली लष्कराने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. त्यावर राहुल गांधींनी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले आहेत, असे मुख्यमंत्री शर्मा म्हणाले होते. राहुल गांधांचा आपल्या देशाच्या लष्करावर विश्वास नाही का? असंही त्यांनी विचारलं आहे. एवढंच नाही तर राहुल गांधींवर टीका करताना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 


नेमकं काय म्हणाले हिमंत बिस्वा सरमा?


राहुल गांधी तुम्ही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागत आहात. आम्ही तुमच्याकडे तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही? याचा पुरावा कधी मागितला आहे का? लष्कराने जर सांगितलं आहे की आम्ही सर्जिकल स्ट्राईक केला आहे तर तो त्यांनी केलाच आहे. त्याचे पुरावे कसले मागता? लष्करात सेवा बजावलेल्या उत्तराखंडच्या सुपुत्रावर तुमचा विश्वास नाही का, असा सवालही त्यांनी केला होता. तुमचा बिपिन रावत यांच्यावर विश्वास नाही का? तुम्हाला पुरावा का हवा आहे? सैनिकांचा अपमान करणे बंद करा असे ते म्हणाले होते. 


अखिलेश यादव यांचा निशाणा 


काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या NSUI ने काल भाजप कार्यालयाबाहेर हिमंता बिस्वा सरमा यांच्या विरोधात निदर्शने केली. आज आसाम भवनासमोर आंदोलन करण्याची योजना आहे. हिमंत बिस्वा यांच्या विधानाने केवळ काँग्रेसच नाही तर इतर पक्षांमध्येही खळबळ उडाली आहे. यावरुन समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही भाजपवर टीका केली आहे. भाजपच्या मुख्यमंत्र्यांचे असभ्य विधान आहे. त्यांचे वक्तव्य हे भाजपच्या स्त्रीविरोधी विचारसरणीचे प्रतीक आहे. हा प्रत्येक आईचा अपमान आहे. हे दुर्दैवी! अत्यंत निंदनीय. असल्याचे त्यांनी म्हटल आहे.


महत्त्वाच्या बातम्या: