सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडीत नवा वाद समोर आला आहे. नगराध्यक्ष निवडीसाठी चेतन चव्हाण आणि राजेश प्रसादी या भाजपच्या दोघांनीही अर्ज भरले. मुळात हे दोघेही भाजपचे नगरसेवक आहेत. यांच्यापैकी कुणीही नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेला अर्ज मागे न घेतल्याने सोमवारी 14 फेब्रुवारीला नवे राजकीय नाट्य पाहायला मिळणार आहे.


कसई दोडामार्ग नगराध्यक्षपदी भाजपाचाच उमेदवार विराजमान होणार यात शंका नाही. मात्र या पदासाठी त्यांचेच दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने ही निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे. यावरून भाजपातील अंतर्गत वाद उफाळून आल्यानेच दोन गटांचे हे उमेदवार रिंगणात कायम राहिल्याची चर्चा आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? कोणत्या उमेदवाराला पक्षातर्फे अधिकृत उमेदवारी जाहीर करून व्हिप बजावणार? याची उत्सुकता असून चर्चांना उधाण आले आहे.


कसई दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये भाजपचे संख्याबळ 14 आहे. तर दोन नगरसेवक शिवसेनेचे, एक नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. भाजपकडे सर्वाधिक नगरसेवक असले तरी बहुमत कोणाकडे जातंय आणि वेळ पडल्यास शिवसेना आणि राष्ट्रवादी कोणाला पाठिंबा देतात, यावर नगराध्यक्ष निवड अवलंबून असणार आहे. त्यामुळे आजपासून प्रत्यक्ष निवडीच्या वेळेपर्यंत दोडामार्गच्या राजकीय क्षेत्रात बऱ्याच घडामोडी घडतील. त्यामुळे कसई दोडामार्ग नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष निवडीत अखेरच्या क्षणी कोण बाजी मारून सिकंदर होतो हे पाहणं महत्त्वाचे आहे.


नगराध्यक्षाची निवडणूक सोमवारी पार पडणार आहे. तोपर्यंत अधिकृत उमेदवार जाहीर करून त्याच्या बाजूने व्हिप बजावली जाऊ शकते. मात्र दोन्ही उमेदवारांतील कोणांस संधी द्यावी अशी समस्या पक्षश्रेष्ठींसमोर निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी योग्य निर्णय घेऊन कोणाला नगराध्यक्षाची अधिकृत उमेदवारी देणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


चेतन चव्हाण हे भाजयुमाचे जिल्‍हा उपाध्यक्ष आहेत. तसेच ते माजी उपनगराध्यक्ष, तत्कालीन गटनेते होते. तर राजेश प्रसादी हे माजी सरपंच आणि माजी स्वीकृत नगरसेवक होते. मागील वेळेला ते पराभूत झाले असले तरी या वेळेला त्यांनी सर्वाधिक मते घेवून विजयश्री खेचून आणली आहे. त्यावेळेला त्यांचा पराभव करुन नगराध्यक्ष पदापर्यंत पोचलेले संतोष नानचे या वेळेला त्यांच्या बाजूने आहेत. चेतन चव्हाण हे मूळ भाजपचे असून प्रसादी हे राणे समर्थक आहेत. दोघेही भाजपचेच असले तरी नगराध्यक्ष निवडणुकीचा सामना मात्र भाजप विरुध्द भाजप असाच असणार आहे. त्यात कोण जिंकतो याकडे आता संपूर्ण जिल्हावासीयाचे लक्ष लागून राहिले आहे.


दोडामार्ग तालुका भाजपात अंतर्गत वाद असल्याने दोन गट असल्याचे वारंवार समोर आले. हे गट-तट मिटविण्यासाठी खुद्द केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना दोडामार्गात यावे लागले होते. मात्र त्यांनी लक्ष घालून काही उपयोग झाला नाही. या दोन्ही गटांतील वाद त्यानंतर वारंवार उफाळून आले. त्यामुळे आता सोमवारी होणाऱ्या कसई दोडामार्ग नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.   


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha