जयपूर : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव करत काँग्रेसने राजस्थानमध्ये बहुमत मिळवले. काँग्रेसने राजस्थानमध्ये आज सत्ता स्थापन केली असून अशोक गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपदाची तर सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जयपूरच्या अल्बर्ट हॉलमध्ये हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडला.


राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंह यांनी अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनाही पद आणि गोपनियतेची शपथ दिली. गेहलोत हे तिसऱ्यांदा राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत तर तरुण आमदार सचिन पायलट यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार हाती घेतला.

या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव, शरद यादव, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुक अब्दुल्ला, डीएमकेचे अध्यक्ष एम. के. स्टालिन उपस्थित होते.