नवी दिल्ली : धनगर आरक्षणावरुन राज्य सरकार लोकसभेत तोंडघशी पडल्याचे पहायला मिळत आहे. धनगर आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारकडून कोणतीही शिफारस अद्याप मिळाली नसल्याचे उत्तर केंद्र सरकारने लोकसभेत दिले आहे. जर केंद्र सरकारपर्यंत आरक्षणाबाबतची शिफारसच पोहोचली नसेल तर हा प्रश्न कधी आणि कसा मार्गी लागणार, असा प्रश्न आता धनगर समाज बांधवांना पडला आहे.


आज शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरुन लोकसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारने आपल्याला याबाबतची शिफारस मिळाली नसल्याचे सांगितले. यावर राज्य सरकारची बाजू मांडताना दुग्धविकास मंत्री महादेव जानकर म्हणाले की, याबाबत आमची अद्याप छाननी सुरु असल्यामुळे आम्ही शिफारस केलेली नाही.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी धनगर नेत्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.