वडोदरा : तुम्हाला आशिया खंडातलं सर्वात मोठं कुराण कोणत्या देशात आहे? असा कुणी प्रश्न विचारला तर तुमच्या मनात पाकिस्तान, बांगलादेश किंवा मलेशियासारख्या मुस्लीम बहुल देशांची नावं येतील. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, आशिया खंडातील सर्वात मोठं कुराण मुस्लीमबहुल देशात नव्हे, तर गंगा-जमुनेच्या किनाऱ्यावर वसलेल्या वडोदरामधील तंदलजामध्ये आहे.

तंदलजामधील दारुल-उलूम मदरशात आशिया खंडातील सर्वात मोठं कुराण आहे. या कुराणाची लांबी 2 मीटर, तर बंद कुराणाची रुंदी 1.5 आणि कुराण उघडल्यास 2.30 मीटर इतकी आहे.



विशेष म्हणजे, या कुराणाच्या देखभालीची जबाबदारी इराणमधील एक टीमकडे आहे. इराण अम्बेसीच्या देखरेखी खाली या कुराणाची देखभाल होते.

मदरशाचे प्रमुख मुफ्ती आरिफ साहब यांनी एबीपी न्यूजला सांगितलं की, हे कुराण तब्बल 240 वर्ष जूनं आहे. तसेच याचे लेखन वडोदरामधील मोहम्मद गौस नावाच्या एका व्यक्तीने केलं होतं. हे कुराण लिहिण्यासाठी गौस यांनी सुरमा आणि इतर साहित्याद्वारे शाई बनवली. तसेच, याच्या लेखनासाठी कागदाची निर्मितीही त्यांनी स्वत:च केली.

या कुराणाचा अर्थ आणि व्याख्या पार्शियन भाषेत आहे. मुफ्ती आरिफ यांच्या मते, हे कुराण लेखन करण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी लागला. यापूर्वी हे कुराण वडोदरामधील एका मशिदीत ठेवण्यात आलं होतं. पण सध्या हे दारुल-उलूम मदरशामध्ये ठेवलं आहे.



दरम्यान, दारुल-उलूम मदरशामध्ये 350 मुलं इस्लामचं शिक्षण घेतात. तसेच या मदरशाद्वारे इयत्ता आठवीपर्यंतची शाळा देखील चालवली जाते. या शाळेत इंग्लिश मीडियमचे 250 तर गुजराती माध्यमाचे 350 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.