India This Week: सरत्या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या. खरंतर सरता आठवडा इतर घडामोडींसोबतच राजकीय घडामोडींना गाजला, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय...  


पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्या-पालख्यांनी वाटचाल सुरु  


गावागावातून पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या दिंड्या-पालख्यांनी वाटचाल सुरु केलीय. तसं महिनाभरापासून शेगावच्या संत गजानन महाराजांची आणि कौंडिण्यपूरच्या माता रुक्मिणीदेवीची पालखी सुरु झालीय. उत्तर महाराष्ट्रातूनही संत मुक्ताई आणि संत निवृत्तीनाथांच्या पालख्यांना सुरुवात होऊन बराच काळ लोटला आहे. देहू आळंदीतून ग्यानबा तुकारामच्या जयघोषात माऊली आणि संत तुकारामांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं की राज्यातल्या पालखी सोहळ्यात एक वेगळंच चैतन्य येतं. यावर्षीही पालख्यांना दरवर्षीच्याच उत्साहात सुरुवात झाली आहे ( वाचा  सविस्तर)


बिपरजॉय चक्रीवादळामुळं राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस, पाच हजार नागरिकांना सुरक्षीतस्थळी हलवले


 बिपारजॉय चक्रीवादळाने मान्सूनला महाराष्ट्रात येण्यासाठी अनुकूल वातावरण तर तयार केलं, पण पावसाअभावी मान्सूनच कोरडाच आहे. शेतकऱ्याच्या आवडीचं मृग नक्षत्रही निम्मं कोरडंच गेलंय.  गुरुवार-शुक्रवारच्या दरम्यान मध्यरात्री हे चक्रीवादळ जखौ किनारपट्टीवर धडकलं. त्यापूर्वी तीन-चार दिवस गुजरात आणि तिकडे पाकिस्तानाही मोठ्या प्रमाणात लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आलं. हवामान खात्याने वादळाच्या लँडफॉलच्या अगोदर दोन दिवस वादळाची तीव्रता कमी झाल्याचं निरीक्षण नोंदवलं होतं.  पण अतीतीव्र दर्जा कायम ठेवण्यात आला होता. (वाचा सविस्तर)


शिवसेनेकडून जाहिरातीत दुरुस्ती, नव्या जाहिरातीत फडणवीस अन् बाळासाहेबांचे फोटो, लोकप्रियतेची टक्केवारीही बेरीज करून सादर 


राजकीय आघाडीवर म्हणाल तर एका जाहिरातीचीही अशीच खूप चर्चा झाली. पण ही जाहिरात कुणी प्रायोजित केली हे अज्ञातच राहिलं. पुढे दोन दिवस त्याचीच चर्चा राज्याच्या केंद्रस्थानी राहिली. त्यावर उतारा म्हणून एक नवीन जाहिरातही दुसऱ्या दिवशी प्रकाशित करण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत व्यासपीठावर एकत्र येणं टाळलं, त्यासाठी वेगळी कारणे दिली हा भाग वेगळा. (वाचा सविस्तर)


 शिंदेसेनेच्या 'त्या' पाच मंत्र्यांना हटवा, भाजप हायकमांडचे आदेश; मराठवाड्यातील तिघांचा समावेश


या आठवड्यात मंत्रिमंडळ विस्ताराची बरीच चर्चा झाली पण पुन्हा सर्व थंड्या बस्त्यात पडलं. शिंदे गटातील पाच मंत्र्यांची गच्छंती होणार असल्याची चर्चा झाली पण त्याचंही पुढे काही झालं नाही. (वाचा सविस्तर)


नीट परीक्षेत मुंबईचा श्रीनिकेत रवी राज्यात पहिला तर दोन विद्यार्थी टॉप 50 मध्ये, पाहा टॉपर्सची संपूर्ण यादी


या आठवड्यातच नीट परीक्षेचा निकाल जाहीर झाला. नीट परीक्षेद्वारे देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रवेश निश्चित होतात. राज्याच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय बाब म्हणायची तर आपल्या महाराष्ट्राचं कोटा अशी ओळख असलेल्या लातूर शहराने यावर्षीही नीटच्या निकालात नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. लातूरच्या वेगवेगळ्या क्लासेस आणि कॉलेजेसमधून शिकणाऱ्या तब्बल दीड ते दोन हजार विद्यार्थ्यांनी नीट क्रॅक केलीय. (वाचा सविस्तर) 


 वाढीव दराने बियाणे विकणाऱ्या पाच दुकानांचे परवाने निलंबित; 'एबीपी माझा'च्या बातमीनंतर कारवाई


एबीपी माझाने एक स्टिंग ऑपरेशन करुन बियाणे विक्रेत्यांची लबाडी उघड केली. त्याची लागलीच दखल घेतली गेली. शेतकऱ्यांना चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले. (वाचा सविस्तर) 


एक्सप्रेस वेवरील जळीतकांडात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 'माझा'च्या रिअॅलीटी चेकमध्ये धक्कादायक वास्तव समोर


मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर केमिकल वाहतूक करणाऱ्या टँकरला आग लागून झालेल्या अपघाताची बातमीही अशीच चटका लावून गेली. या अपघातामुळे तब्बल पाच सहा तास पुणे मुंबई वाहतूक ठप्प झाली होती आणि चार निष्पापांचा बळी गेला. त्यांना हायवेवरील ट्रामा सेंटर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेलं नसल्यामुळे वेळेवर उपचारही मिळू शकले नाहीत. हा एबीपी माझाने केलेला पंचनामाही व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालणारा ठरला.  (वाचा सविस्तर)


बृजभूषण सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आरोपपत्र सादर 


भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह  यांच्याविरोधात करण्यात आलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, या आरोपपत्रामध्ये महिला कुस्तीपटूंवर  केलेल्या लैंगिक शोषणाच्या तक्रारींमधील किमान चार प्रकरणांमध्ये फोटोंचे पुरावे आणि तीन प्रकरणांमध्ये व्हिडीओ पुरावे देण्यात आले आहेत. (वाचा सविस्तर)